न्यूयॉर्क : जागतिक स्तरावर सर्वोच्च पुरस्कार म्हणून ऑस्कर पुरस्कार सोहळा ओळखला जातो. हा सोहळा काल अखेर पार पडला. मात्र या कार्यक्रमाला एका घटनेमुळे गालबोट लागले आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार पटकावणाऱ्या अभिनेता विल स्मिथ याने सूत्रसंचालक क्रिस रॉकच्या भर कार्यक्रमात कानशिलात लगावली होती. या घटनेनंतर याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर विल स्मिथने एक पोस्ट शेअर करत क्रिस रॉकची जाहीर माफी मागितली आहे.
विल स्मिथने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे विल स्मिथने या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केले आहे. यावर विल स्मिथ म्हणाला, “कोणत्याही स्वरूपात होणारी हिंसा ही विषारी आणि विनाशकारी असते. काल रात्रीच्या अकादमी पुरस्कार सोहळ्यातील माझे वर्तन अस्वीकार्य आणि अक्षम्य होते. माझ्या खर्चाची खिल्ली उडवणे हा माझ्या कामाचा भाग आहे. पण पत्नी जाडाच्या वैद्यकीय स्थितीची खिल्ली उडवण्यात आल्यानंतर माझ्या सहनशक्तीचा अंत झाला आणि मी भावनेच्या भरात ते पाऊल उचलले.”
View this post on Instagram
“क्रिस, या प्रकरणानंतर मला तुझी जाहीरपणे माफी मागायची आहे. मी माझी हद्द ओलांडली. मी चुकीचा होतो. मला याची लाज वाटत आहे. मी काल केलेली ही कृती मला जो माणूस व्हायचे आहे, त्यासाठी योग्य नाही. प्रेम आणि दयाळूपणाच्या जगात हिंसेला स्थान नाही. मी अकादमीची, शोचे निर्माते, सर्व उपस्थित आणि जगभरात हा कार्यक्रम पाहणाऱ्या प्रत्येकाचीही जाहीर माफी मागू इच्छितो. मला विल्यम्स कुटुंबाची आणि माझ्या राजा रिचर्ड कुटुंबाचीही माफी मागायची आहे. माझ्या वागण्याने या सुंदर प्रवासावर एक डाग पडला आहे, याचे मला मनापासून खेद वाटतो. मी त्यावर काम करत आहे आणि करेन”, असे विल स्मिथ म्हणाला.
विल स्मिथने शेअर केलेली ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्याची ही पोस्ट व्हायरल होतानाही दिसत आहे. त्याच्या या पोस्टवर क्रिसने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र त्याची ही पोस्ट अनेक सेलिब्रिटींना लाईक केल्याचे पाहायला मिळत आहे.