शिरूर, आंबेगावात उपद्रवमूल्यांचा प्रादुर्भाव होणार?

महायुतीच्या जागावाटपानंतरच ठरणार इच्छुक उमेदवारांचे भवितव्य

– राजेंद्र वारघडे

पाबळ – शिरूर- आंबेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्राबल्य गेल्या सहा निवडणुकांमध्ये दिसून आला आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीतून होत असलेली औटघटका व खासदार शिवाजीराव आढळराव यांच्याकडे देण्यात आलेल्या संपर्क प्रमुखपदाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा कस लागणार आहे. शिरूर- आंबेगाव मतदारसंघामध्ये महायुती झाली नाही तर शिरूर मतदारसंघातही जोरदार लढाई होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नुकतेच राष्ट्रवादीतून शिवसेनेच्या व्यासपीठावर हजेरी लावणाऱ्या मातब्बर नेत्यांकडून उपद्रवमूल्यांचा प्रादुर्भाव होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

शिरूर व शिरूर आंबेगाव या दोन्ही मतदारसंघात एका कॉमन “उपद्रव मूल्य’ असलेल्या नेत्यामुळे दोन्ही मतदारसंघात घडामोडी बदलत आहेत. येत्या दोन दिवसांत निश्‍चित गणिते उदयाला येण्याची शक्‍यता असल्याची माहिती शिवसेनेच्या गोटातून मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे मोठे पद देऊन या नेत्याचे उपद्रवमूल्य थांबवण्याचा झालेला प्रयत्न आता राष्ट्रवादीवर उलटण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. दोन्ही मतदारसंघात युती नाही झाली तर या उपद्रवमूल्याचा त्रास कसा निस्तरायचा, याचे उत्तर शोधावे लागणार आहे. मोठे साहेब यातून काय मार्ग काढतात का, याची प्रतीक्षा कदाचित या नेत्यांना, असावी अशी चर्चा आहे.

पूर्वीच्या शिरूर मतदारसंघातील 39 गावे शिरूर आंबेगाव मतदारसंघाला जोडून शिरूर- आंबेगाव हा मतदारसंघ निर्माण करण्यात आला आहे. त्या गावांचे मतदान शिरूर आंबेगाव मतदारसंघाला विजयाला पूरक ठरते, हा गेल्या तीन निवडणुकांमधील इतिहास आहे. उर्वरित शिरूरमधील गावांचे मतदान शिरूर मतदारसंघाला विजयाला पूरक ठरते, हा इतिहास आहे. याच पार्श्‍वभूमीवर या नेत्याचे या दोन्ही पूरक गावात असलेले वजन दोन्ही मतदारसंघात सोयीचे असेल त्याला पूरक ठरत आहे. या घडामोडी राष्ट्रवादीला त्रासदायक ठरण्याची शक्‍यता आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडीच्या मुळाशी भाजपकडून शिवसेनेची होत असलेली जागा वाटपातील ओढाताण कारणीभूत होण्याची दाट शक्‍यता जेष्ठ शिवसेना नेत्यांनी बोलून दाखवली आहे. यात अति अपघटन झाली तर शिवसेना भाजप स्वतंत्र लढण्याची शंभर टक्‍के शक्‍यता असल्याची खात्री निर्माण झाली असल्याची माहिती मिळत आहे.

याच पार्श्‍वभूमीवर तिकिटाचा शब्द फिरवल्याचा राग मनात धरलेल्या या नेत्याचा वापर खासदार आढळराव करणार आणि एक दगडात या दोन्ही मतदारसंघाचे पक्षी टिपणार अशी शक्‍यता बोलून दाखवली जात आहे. त्यामुळे आता युतीची प्रतीक्षा लागून राहिली आहे; अन्यथा स्वतंत्र लढण्याची प्रतीक्षा आहे. यात युती झाली नाही तरी शिरूर आंबेगावमध्ये उपद्रवमूल्य महाग पडणार, अशी व्यूहरचना खासदार आढळराव यांनी केली असल्याची चर्चा आहे.

दोन दिवस थांबा
शिरूर- आंबेगाव मतदारसंघातबाबत या नेत्याने आंबेगाव भागातील एका कार्यक्रमात हजेरी लावून शिवसेनेची पालखी उचलल्याचा भाषणात उल्लेख करून या भागात उपद्रवमूल्य सुरू केल्याची चुणूक दाखविली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे बरेच नेते उपस्थित होते. याची माहिती पत्रकारांना देऊन “दोन दिवस थांबा’ अशी माहिती दिली आहे. त्यामुळे हे उपद्रवमूल्य कोणाच्या मानगुटीवर बसणार, याची चर्चा दोन्ही तालुक्‍यात सुरू झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)