मुंबई – राज्य शासनाच्या तिजोरीत खडखडाट झाल्याने अनेक योजनांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे. एक लाख कोटी रुपयांची तूट भरून काढण्यासाठी शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधा यासह इतर योजना बंद करण्याच्या विचारात राज्य सरकार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर भार वाढला आहे. आगामी अर्थसंकल्पासाठी घेण्यात येणाऱ्या विविध विभागनिहाय बैठकांमध्ये इतर योजना बंद करण्यासंदर्भात चाचपणी केली जाणार आहे.
शिवभोजन थाळी उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना सुरू करण्यात आली होती. त्यावेळी छगन भुजबळ अन्न व नागरी पुरवठा मंत्री होते. राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे, दोन लाख कोटींहून अधिक तूट आहे. त्यामुळे एक लाख कोटींची तूट भरून काढली तर गाडा सुरळीत चालू शकतो, असे अर्थमंत्र्यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात विभागवार बैठका सुरू आहेत.
शिवभोजन थाळीचे दिवसाचे लाभार्थी सुमारे १ लाख ९० हजार आहेत. या योजनेसाठी वार्षिक खर्च २६३ कोटी रुपये लागतात. तसेच आनंदाचा शिधा ही योजना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू करण्यात आली होती. दिवाळी, शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला होता. आनंदाचा शिधा म्हणून चार वस्तू १०० रुपयांत दिल्या जातात. बाजारात याची किंमत ५०० रुपये इतकी आहे. त्यामुळे उरलेली रक्कम राज्य सरकार आपल्या अनुदानातून भरत होते.
अर्थमंत्र्यांनी काही आढावा बैठका घेतलेल्या आहेत. त्यामध्ये दोन्ही योजना बंद करायच्या का अशी चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. यापूर्वी शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा योजना बंद करावी का अशा चर्चा झाल्या होत्या तेव्हा विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. आता अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यामुळे या योजना बंद करायच्या का अशा चर्चा सुरू आहेत. लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर भार वाढलेला आहे. कंत्राटदारांची ८९ हजार कोटी रुपयांची थकबाकी असल्याने आंदोलन सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर काय निर्णय होतो ते पाहावे लागेल.