येचुरींना बंगाल मधून राज्यसभेवर पाठवणार

कोलकाता – मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांना पश्‍चिम बंगाल मधून राज्यसभेवर पाठवण्याच्या प्रस्तावावर पक्षात विचार सुरू आहे. त्यासाठी त्यांना कॉंग्रेसची मदत घ्यावी लागणार आहे. येचुरी हे सन 2005 ते 2017 या काळात राज्यसभेचे सदस्य होते. त्या काळात त्यांचे ट्रॅक रेकॉर्ड लक्षणीय राहिले आहे. त्यामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत त्यांना बंगाल मधून राज्यसभेची संधी दिली जाण्याची शक्‍यता आहे.

अर्थात मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे त्या विधानसभेत तितके संख्या बळ नसले तरी कॉंग्रेसने साथ दिली तर येचुरींचा मार्ग सुकर होऊ शकतो. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नियमानुसार कोणताहीं सदस्य सलग तीन वेळा राज्यसभेवर नियुक्त केला जात नाहीं. त्यामुळे सन 2017 मध्ये कॉंग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी तयारी दर्शवून सुद्धा मार्क्‍सवादी पक्षाने येचुरींना उमेदवारी देण्यास नकार दिला होता.

तथापी आज देशात अभुतपुर्व स्थिती उद्‌भवली आहे आणि अशा स्थितीत अभुतपुर्व कामगीरी करू शकणाऱ्या येचुरी यांनाच तिकडे पाठवण्याची गरज असल्याने यावेळी नियमाला अपवाद करून आम्ही त्यांना राज्यसभेवर पाठवण्यास उत्सुक आहोत असे मार्क्‍सवादी पक्षाच्या एका नेत्याने पीटीआयला सांगितले.

येचुरी यांना मध्यंतरी तीन वर्षांसाठी ब्रेक दिला गेला आहे. त्यामुळे त्यांना आता उमेदवारी देण्यात नियमाची अडचण येणार नाही असेही या नेत्याने स्पष्ट केले. आज संसदेच्या कोणत्याही सभागृहात मार्क्‍सवादी कम्यिुनस्ट पक्षाचा सदस्य प्रतिनिधी नाही. अशी वेळ 1964 नंतर प्रथमच उद्‌भवली आहे. पश्‍चिम बंगाल मधून राज्यसभेवर पाच सदस्य निवडून दिले जाणार आहेत त्या निवडणुका येत्या फेब्रुवारी महिन्यात होणार आहेत.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here