मुंबई : करोनाच्या नवा व्हेरियंट ओमिक्रॉनने पुन्हा एकदा जगाला धडकी भरली आहे. त्यामुळे जगभरात सगळीकडे खबरदारीच्या उपाययोजना आखल्या जात आहेत. राज्यातदेखील ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सर्तकता बाळगण्यात येत आहे. त्यातच आता १ डिसेंबरपासून राज्यातील प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला. ओमिक्रॉनच्याच मुद्द्यावरून प्रश्न उपस्थित होत असतानाआरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.
राजेश टोपे यांनी म्हटले की, शाळेबाबत आरोग्य विभागाने परवानगी दिली असली तरी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. शाळा सुरू होण्याची आमची परवानगी आहे. पियाड्रिक स्टाफने अगोदरच या बाबत अनुकलता दाखवली असल्याचे त्यांनी सांगितले.
मॉल्स ,थेटर सगळीकडे अटींसह परवानगी दिलेली आहे. पुढील काळात संक्रमण लक्षात घेऊन निर्बंध शिथिल करायचे का या बाबत निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी म्हटले. लसीकरणाची सक्ती केली जाऊ शकत नाही. मात्र, लसीकरण करावे यासाठी प्रभावी पद्धतीने लोकांना समजवून सांगण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत होणाऱ्या व्हिडीओ कॉन्फरसिंगमध्ये आरोग्य मंत्री राजेश टोपे तसेच राज्यातील सर्व आयुक्त, जिल्हाधिकारी आणि आरोग्य सचिव या बैठकीत सहभागी होणार आहेत. या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा होणार आहे. या बैठकीत दक्षिण आफ्रिका तसेच इतर युरोपियन राष्ट्रातून येणाऱ्या विमान प्रवाशांमुळे होणारा प्रादुर्भाव त्यावरील उपायांची चर्चा करण्यात येणार आहे. त्याशिवाय कोरोनाची तिसरी लाट आल्यास त्याला सामोरे जाण्यासाठीच्या सज्जतेबाबतही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.