मुंबई : राज्य विधीमंडळ हे तर ‘चोर’मंडळ, असल्याचे बोलत संजय राऊतांनी शिंदे गट आणि भाजपवर थेट निशाणा साधला. त्यांच्या याच विधानामुळे आजच्या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक हे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. एवढेच नाही तर कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले. दरम्यान, संजय राऊत यांच्या वक्तव्यावर दोन दिवसांत चौकशी करणार असून पुढील बुधवारी हक्कभंग प्रकरणावर निर्णय देणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाचा ‘चोर’मंडळ असा उल्लेख केला. राऊतांच्या याच वक्तव्यावरुन अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला. राऊतांविरोधात सत्ताधारी शिवसेना गट आणि भाजप आक्रमक झाल्याचे दिसून आले. तसेच, राऊतांविरोधात हक्कभंग आणण्याची मागणीही भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केली.
यावरुन विधीमंडळात गदारोळ झाला. यावर निर्णय देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांचे मत वाचून दाखवले. तसेच, दोन दिवसांत यासंदर्भात चौकशी करुन पुढील निर्णय बुधवारी जाहीर करु असे राहुल नार्वेकर यांनी निवेदनातून सांगितले. त्यासोबतच निर्णय वाचून दाखवताना सभागृहाचा अवमान झाल्याची टिप्पणीही राहुल नार्वेकर यांनी केली.
राहुल नार्वेकर यांनी राऊतांविरोधातील हक्कभंगाच्या प्रस्तावावर निर्णय दिल्यानंतरही सभागृहात गदारोळ सुरुच होता. सत्ताधारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. एकंदरीतच संजय राऊतांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्यासाठी सत्ताधारी आग्रही दिसत आहेत. दुसरीकडे संजय राऊत यांनी कोल्हापुरात बोलत असताना आपल्या वक्तव्याचा पुनरुच्चार करत आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असून त्या वक्तव्याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.