नवी दिल्ली – भारताच्या आघाडीच्या बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू पुढील आठवड्यात स्वित्झर्लंडमधील बसेल येथे रंगणाऱ्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत एकमेकींशी भिडणार आहेत. जागतिक बॅडमिंटन महासंघाने या स्पर्धेच्या महिला एकेरीच्या वेळापत्रकात अचानकपणे बदल केल्यामुळे सायना आणि सिंधूचा उपान्त्य फेरित समोरासमोर येण्याची शक्यता आहे.
स्पर्धेत सिंधूला पाचवे मानांकन मिळाले असून पहिल्या फेरीत पुढे चाल देण्यात आली आहे. त्यानंतर सिंधूचा सामना चायनीज तैपेईची पै यू पो किंवा बल्गेरियाच्या लिंडा झेटचिरी यांच्यामधील विजेत्याशी होणार आहे. सिंधूसमोर तिसऱ्या फेरीत अमेरिकेच्या बेईवेन झॅंग हिचे आव्हान असण्याची शक्यता आहे.
आठव्या मानांकित सायनालाही पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली असून दुसऱ्या फेरीत स्वित्झर्लंडची सॅबरिना जॅकेट आणि नेदरलॅंड्सची सोराया डे विच इजबेरगेन यांच्यातील विजेतीशी सामना करावा लागेल. सायनाला तिसऱ्या फेरीत डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्ड हिच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. या संदर्भात जागतिक बॅडमिंटन महासंघाने म्हटले आहे की, काही खेळाडूंना चुकून महिला एकेरीच्या वेळापत्रकात स्थान देण्यात आले होते. ही चूक लक्षात आल्यानंतर वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.