मोठ्या पडद्यावर आपल्या अदांनी सर्वांना घायाळ करणारी अभिनेत्री रेखा आता छोट्या पडद्यावर डेब्यू करणार आहे. “गुम है किसी के प्यार में’ या टीव्ही शोमधून ती छोट्या पडद्यावर दस्तक देणार आहे.
या शोचा एक प्रोमो व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे, ज्यामध्ये रेखा खूपच सुंदर दिसत आहे. प्रोमोच्या सुरुवातीस रेखा ही “गुम है किसी के प्यार में…’ हे गाणे गाताना दिसत आहे.
यात रेखाने गोल्डन कलरची सिल्क साडी परिधान केली आहे. कपाळावर टिकली, कानात मोठमोठे झुमके आणि हातात पूर्ण बांगड्या घालून ती खूपच सुंदर दिसत आहे. या प्रोमोत रेखा म्हणते, खरं तर हे गाणं माझ्या हृदयाच्या अगदी जवळ आहे.
यात कुठेतरी एक छुपे रहस्य आहे. जिथे प्रेमाची प्रतीक्षा आहे, परंतु त्याचे नाव घेण्याची परवानगी नाही. तसेच जेव्हा सकाळ-संध्याकाळ एखाद्याच्या प्रेमात हृदय हरविते, तेव्हा प्रेम पूजा बनते.
दरम्यान, ही मालिका स्टार प्लसवर लवकरच टेलिकास्ट करण्यात येणार आहे. मात्र, अद्याप निर्माता आणि रेखाने आपल्या भूमिकेबाबत काहीही सांगितलेले नाही. यामुळे रेखाच्या भूमिकेबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.