शासकीय विश्रामगृहावर बैठकीत घेतला आढावा
सातारा – सातारचे मेडिकल कॉलेज लवकर सुरू व्हावे, यासाठी आज साताऱ्यात मीटिंग घेतली आहे. हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावला जाईल. याशिवाय बा. सी. मर्ढेकर याच्या स्मारकाचे उदघाटन अद्याप का झाले नाही, याची माहिती मुंबई येथे गेल्यानंतर घेऊ, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना शनिवारी रात्री दिली.
सातारा येथील मेडिकल कॉलेजच्या अनुषंगाने विश्रामगृहावर आयोजित बैठकीपूर्वी ते बोलत होते. साताऱ्यातील शासकीय मेडिकल कॉलेजचा प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी येथे आलेलो आहे. मेडिकल कॉलेजचा आराखडा प्रवेश प्रक्रिया पदनिर्मिती, होस्टेलची उभारणी याबाबत चर्चा करून ते अंतिम करण्यासोबतच अर्थसंकल्पातून निधीची तरतूद किती करावी लागेल, याची माहिती त्यांनी अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकित घेतली.
राज्याच्या अर्थसंकल्पातून पहिल्या टप्प्यात सुमारे 80 ते 100 कोटी निधी उपलब्ध करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे पवार यांनी सांगितले.
पुस्तकांचे गाव भिलार गुंडाळण्याचा प्रकार राज्याच्या सांस्कृतिक कार्यमंत्रालयातील सचिवांकडून सुरू असल्याबाबतचा मुद्दा पत्रकारांनी मांडला. त्यावर त्यांनी काही पुरावा आहे का, असेल तर दाखवा, असे सांगितले. यानंतर आ. मकरंद पाटील यांनी भिलार गावाची नेमकी माहिती पवार यांना दिली. पण प्रत्यक्ष गटविकास अधिकाऱ्यांना आलेल्या आदेशाची प्रत पाहिल्यावर त्यांनी पुस्तकाचे गाव गुंडाळण्याबाबत आपण मुंबईत गेल्यावर प्रत्यक्ष माहिती घेऊ, असे सांगितले.
मर्ढे येथील कविवर्य बा. सी. मर्ढेकर यांच्या स्मारकाचा मुद्दा मांडला. स्मारकाचे काम पूर्ण असूनही अद्याप त्याचे उद्घाटन झालेले नाही, असे पत्रकारांनी सांगितले. त्यावर त्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना नेमकी परिस्थिती काय याची विचारणा केली. तसेच या कामाचे उद्घाटन आजपर्यंत का झाले नाही, स्थानिक आमदार व पालकमंत्री यांनी आजपर्यंत का निर्णय घेतला नाही, असा प्रश्न केला. त्यानंतर हा मुद्दा मंत्रालयातील बैठकीत आपण चर्चेस घेऊन आजपर्यंत स्मारकाचे उद्घाटन का झाले नाही, याची नेमकी चौकशी करून निर्णय घेऊ असे सांगितले.यावेळी खा. श्रीनिवास पाटील, अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, सारंग पाटील आदी उपस्थित होते