पुणेकरांचे “पाणी टेन्शन’ संपणार का?

कपातीने होरपळणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळण्याची चिन्हे
जुलैमध्येच 18 टीएमसीवर साठा पोहोचल्याने दिलासा

आता नियोजनाची गरज

मागील वर्षी ऑगस्टमध्ये ही चारही धरणे 98 टक्के भरली होती. मात्र, पाटबंधारे विभागाकडून परतीच्या पावसाची आशा ठेवत या चारही धरणांतील पाणी मोठ्या प्रमाणात खडकवासला कालवा तसेच मुठा नदीत सोडण्यात आले. त्यामुळे पावसाळा संपल्याची घोषणा झाल्यानंतर या चारही धरणात सुमारे 82 टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे पुढील वर्षभर त्याचे परिणाम नागरिकांना वेळोवेळी भोगावे लागले. पाणी नियोजनावरून संपूर्ण वर्षभर महापालिका आणि जलसंपदा विभागात वाद झाले. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागली. त्यामुळे यंदातरी परतीच्या पावसाचा भरवसा न ठेवता वेळीच नियोजन करण्याची गरज आहे.

पुणे – खडकवासला धरणसाखळीत पावसाने दमदार पुनरागमन केल्याने शहराची वर्षभराची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. या चारही धरणांतील पाणीसाठा जुलैमध्येच 18 टीएमसीवर पोहचला असून पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविल्याने पाणीसाठ्यात चांगली वाढ होणे अपेक्षित आहे. मागील वर्षी परतीच्या पावसाने दगा दिल्याने या धरणांमध्ये केवळ 24 टीएमसी पाणी होते. त्यामुळे ऑक्‍टोबर 2018 पासून पुणेकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आता धरणात चांगला साठा झाल्यास पुणेकरांना पुढील वर्षभर पुरेसे पाणी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

यंदा जून महिना पूर्ण कोरडा गेल्यानंतर जुलैच्या सुरूवातीलाच दमदार पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे धरणसाठ्यात वाढ होण्यास सुरूवात झाली होती. हा पाऊस सुरूवातीचे दोन आठवडे झाल्यानंतर जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. शहराला 10 टक्के पाणी कपात करून एक वेळ पाणी द्यायचे झाल्यास वर्षाला सुमारे 14 ते 15 टीएमसी पाण्याची आवश्‍यकता भासते. तर कोणतीही कपात न करता, शहराच्या काही भागाला दोन वेळ आणि इतर भागाला एक वेळ सुमारे पाच तास पाणी द्यायचे झाल्यास सुमारे 16 ते 17 टीएमसी पाण्याची गरज भासते.

त्यामुळे या दोन्ही स्थितीत महापालिकेस पाणी देण्याचे नियोजन झाल्यास हे पाणी पुढील वर्षभर पुरेल एवढे आहे. त्यामुळे तूर्तास तरी शहराच्या पाण्याची चिंती मिटल्याचे चित्र आहे. या वर्षी जुलैच्या सुरूवातीला धरणात केवळ सव्वादोन टीएमसी पाणी शिल्लक होते. मात्र तीन आठवड्यांतच हा साठा 18 टीएमसीवर गेला आहे. तर यंदाही परतीचा पाऊस पडणार नाही, असे गृहीत धरले तरी ऑगस्ट मध्ये चांगल्या पावसाचा अंदाज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)