पुणे : करोनाचा वाढत्या संसर्गामुळे देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे एचआयव्ही आणि टीबीची औषधे सुरु असलेल्या रुग्णांना एआरटी केंद्रावर जाऊन औषधे घेण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे अशा रुग्णांना घरपोच औषधे देण्यात येणार असून त्यासाठी 2 संस्थांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती पुणे एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद सोनवणे यांनी दिली. या रुग्णाच्या उपचारात खंड पडल्यास गंभीर स्थिती उद्भवते त्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नंदापुरकर यांच्या सूचनेनुसार तालुका निहाय रुग्णांना ही औषधे देण्यात येणार आल्याचे सोनवणे यांनी स्पष्ट केले.
पुणे जिल्हयात सात ठिकाणी एआरटी केंद्र असून 19 ठिकाणी लिंक केंद्र आहेत. या सर्व ठिकाणी रुग्णांना औषधें उपलब्ध करून दिली जातात. मात्र, लॉकडाऊन मुळे तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने या रुग्णांना केंद्रापर्यंत पोहचता येत नाही. अशा रुग्णांना घरपोच तसेच जवळच्या शासकीय केंद्रवर औषधे मिळावीत यासाठी विहान आणि रिलीफ फाउंडेशन यांच्या मदतीने घरपोच औषधे पुरविली जाणार आहेत. त्यामुळे रुग्णांनी कोणतीही काळजी न करता नजीकच्या उपजिल्हा रुग्णालयात अथवा ज्यांना रुग्णालयात जाणे शक्य नाही त्यांनी 7219121505 किंवा 9970746686 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी.
तसेच ज्या रुग्णांना एआरटी केंद्रावर जाणे शक्य आहे. त्यांनी आपल्या जवळील हिरवे कार्ड पोलिसांना दाखविल्यास त्यांना सोडण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. तर जिल्हयात मदतीसाठी वायआरजी, ताल या संस्थेची मदत घेण्यात आल्याचे सोनवणे यांनी स्पष्ट केले
तर जिल्ह्यातील अथवा जिल्ह्या बाहेरील कोणत्याही रुग्णांना सर्व शासकीय रुग्णालयात औषधे मिळणार असून त्या बाबतच्या सूचना सर्व संबंधितांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे औषधे संपत आली म्हणून रुग्णांनी न घाबरता शासकिय रुग्णालयात जावे अथवा आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. नंदापुरकर यांनी केले आहे.