आमदार शेळके यांच्या जनसंपर्क कार्यालयास भेट
तळेगाव दाभाडे (वार्ताहर) –आमदार सुनील शेळके यांच्या तळेगाव दाभाडे येथील जनसंपर्क कार्यालयास पर्यटन व क्रीडा राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी सदिच्छा भेट दिली. मावळ तालुक्यातील पर्यटनाला अधिकाधिक चालना दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
या वेळी आमदार शेळके यांच्या पत्नी सारिका शेळके यांनी राज्यमंत्री तटकरे यांचे औंक्षण करुन स्वागत केले. विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती भेट दिली. या वेळी जिल्हा परिषद सदस्या शोभा कदम, तळेगावच्या उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, नगरसेविका मंगल भेगडे, संगीता शेळके, राष्ट्रवादी कॉंग्रेस शहर अध्यक्ष सुनीता काळोखे, माजी नगरसेविका माया भेगडे यांच्यासह मावळ तालुक्यातील राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
आमदार सुनील शेळके यांच्याशी तटकरे यांनी विविध विषयांवर चर्चा केली. मावळच्या पर्यटनाचा विषय त्यांनी यावेळी आग्रहाने मांडला. मावळ तालुक्यात शिवकालीन गड-किल्ले आहेत. या गड-किल्ल्यांचा विकास आणि संवर्धन केल्यास तालुक्यातील विकासाला चालना मिळेल, असे सांगितले.
तसेच क्रीडा क्षेत्राचा विकास व्हावा, यासाठी योग्य ते निर्णय घ्यावेत, अशी मागणी केली. यावेळी झालेल्या चचनंतर मावळ तालुक्यातील गड-किल्ल्यांचे संवर्धन करून किल्ल्यावर विविध विकासकामे करून पर्यटनाला चालना दिली जाईल, तसेच क्रीडा क्षेत्राशी निगडित सर्व विषय मार्गी लावले जातील, असे आश्वासनही तटकरे यांनी यावेळी दिले.