विधानपरिषदेवर संधी द्यावी : इंदापुरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची मागणी
रेडा, (प्रतिनिधी) – राज्याच्या विधानपरिषदेसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. यामुळे सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची मांदियाळी असून आमदारकीची “लॉटरी’ कोणाला लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, दत्तात्रय भरणे हे इंदापूर विधानसभेचे आमदार असून राज्यमंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही त्यांच्याकडे आहे. त्यामुळे त्याच्यांवरील भार कमी करण्यासाठी व इंदापूर विधानसभा मतदारसंघातील मतदार नाराज न होण्यासाठी राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांना विधानपरिषदेची आमदारकी मिळू शकते, अशी चर्चा सध्या मतदारसंघात रंगू लागली आहे, तरी अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार असून त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यात व पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जाळे मजबूत करण्यासाठी प्रदीप गारटकर यांचे मोठे योगदान आहे. तर इंदापूर विधानभा गारटकर यांनी तीनवेळा लढवली आहे. मात्र, अगदी नगण्य मतांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. तरी देखील कधीही न खचता ते अविरतपणे समाजसेवा करीत आहेत. आघाडीच्या काळात मंत्रिमंडळात कॉंग्रेसचे हर्षवर्धन पाटील यांचा दबदबा होता, तरी देखील तालुक्यात राष्ट्रवादीचा कार्यकर्ता टिकून ठेवण्यामध्ये गारटकर यशस्वी झाले होते.
…तर मतदारसंघात तीन आमदार?
इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार दत्तात्रय भरणे आहेत. तर आता विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून माजीमंत्री हर्षवर्धन पाटील तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून प्रदीप गारटकर यांना संधी द्यावी, अशी मागणी जोर धरीत आहे. जर या दोघांनाही विधानपरिषदेची आमदारकी मिळाली तर एका विधानसभेत तीन आमदार होतील, अशी चर्चाही सध्या तालुक्यात रंगत आहेत.
समाजकारण, राजकारण करीत असताना पवार कुटुंबांशी अत्यंत जवळचे स्नेहसंबंध गारटकर यांचे आहेत. तर गेल्या 15 वर्षांपासून राष्ट्रवादीचे जाळे मजबूत करण्यासाठी ते दिवसरात्र मेहनत घेत असून जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारीही ते नेटाने सांभळात आहेत. त्यांच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या कार्यकाळत विधानसभा 2019ची निवडणूक झाली. त्यात हर्षवर्धन पाटील यांनी कॉंग्रेसला बायबाय करीत भाजपचे कमळ हातात घेतले.
त्यामुळे इंदापूर तालुक्यात कमळ फुलणार अशी चर्चा रंगली होती. तर इंदापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसला कोणतीही झळ बसू नये म्हणून त्यांनी पक्षश्रेष्ठी व आमदार भरणे यांच्या खांद्याला खांदा लावत व्यूह रचना आखल्या अन् आमदार भरणेंना पुन्हा एकदा विधानसभेवर पाठवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. तर जिल्ह्यात दोन खासदार व सात आमदार निवडून आणण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे, त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकिटावर गारटकर यांना विधानपरिषदेवर पाठवले जाईल, असा विश्वास इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.