कीटक फवारणी शुल्क वाढणार?

शुल्कवाढीवर महापालिका प्रशासन ठाम

पुणे – अल्पदरात झुरळ आणि ढेकूण मारण्यासाठी महापालिकेकडून दिली जाणारी पेस्ट कंट्रोलची सेवा लवकरच महागणार आहे. महापालिकेकडून सद्यस्थितीला दहा बाय दहाच्या खोलीसाठी 250 रुपये इतके शुल्क आकारण्यात येत असून ते आता 300 रुपये इतके होणार आहे.

महापालिकेच्या कीटक प्रतिबंधक विभागाकडून ढेकूण व झुरळेनाशक फवारणी केली जाते. याबाबत स्थायी समितीने जुलै 2012 च्या ठरावानुसार या फवारणीसाठी 100 चौरस फुटांसाठी 250 रुपये इतके शुल्क आकारण्यात येत आहे. मात्र, या शुल्कात वाढ करावी असा प्रस्ताव भाजप नगरसेविका आरती कोंढरे व मनिषा लडकत यांनी स्थायी समितीला दिला होता. त्यावर समितीने प्रशासनाकडून अभिप्राय मागविला होता.

आयुक्त सौरभ राव यांनी गेल्या सहा वर्षांत कीटक नाशकांच्या औषधांचा खर्च तसेच त्यासाठी आवश्‍यक असलेला मनुष्यबळ आणि स्टेशनरीच्या खर्चातही वाढ झाली असल्याने हे शुल्क 300 रुपये इतके करण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रशासन या निर्णयासाठी आग्रही असले, तरी स्थायी समिती काय निर्णय घेणार यावर या ठरावाचे भवितव्य अवलंबून आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.