मात्र व्यवहाराची माहिती भारतातच साठविण्याचे बंधन
पुणे – व्हॉट्सऍप सारख्या सोशल मीडिया कंपन्या आता पेमेंट सेवा सुरू करण्याबाबत तांत्रिक स्वरूपाचा गृहपाठ करीत आहेत. मात्र, या कंपन्यांना केंद्र सरकारकडून व्यवहाराचा डेटा भारतातच ठेवण्याचे बंधन घालण्यात आले आहे.
भारतामध्ये सोशल मीडियाचे प्रमाण बरेच आहे. कोट्यवधी लोक सोशल मीडियाचा वापर करतात. त्यामुळे अशा कंपन्यांनी पेमेंट सेवा सुरू केली तर, अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यामुळे व्यवहाराच्या अगोदर आणि व्यवहारानंतर निर्माण झालेला डेटा हा भारतातच राहिला पाहिजे, अशी अट केंद्र सरकारने घातली आहे. कारण, या सोशल मीडिया कंपन्या भारतात सक्रिय असल्या तरी त्यांची डेटा स्टोअर सेंटर आणि मुख्यालय हे परदेशात असतात.
भारतातील व्यवहाराची माहिती भारतातच ठेवण्याबाबतची यंत्रणा निर्माण करण्यासाठी व्हॉट्सऍप प्रयत्न करीत असल्याचे सांगितले जाते. हे काम दोन महिन्यांत पूर्ण होणार आहे. त्यानंतर या शक्यतेवर विचार केला जाणार आहे.
याबाबत राष्ट्रीय पेमेंट महामंडळ म्हणजे “एनपीसीआय’चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप आसबे म्हणाले, समाजमाध्यम कंपन्यांनी जरी पेमेंट सेवा सुरू केली तरी, ही भारतातील रोखीचा व्यवहार कमी होण्यास बराच कालावधी लागू शकतो.
केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेने बराच प्रयत्न करूनही सध्या डिजिटल व्यवहाराचे प्रमाण विकसित देशांच्या तुलनेत फारच कमी आहे.
गेल्या एक वर्षापासून व्हॉट्सऍप प्रायोगिक पातळीवर ही सेवा चालवीत आहे. त्यानंतरच्या घडामोडीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. चीनमध्ये “वुई चॅट’ नावाच्या समाजमाध्यमाच्या माध्यमातून डिजिटल व्यवहाराला चालना मिळाली होती, आणि आता चीन डिजिटल व्यवहारात भारताच्या कितीतरी पुढे आहे. या व्यवहारासंदर्भातील डेटा भारतातच ठेवण्याबाबत व्हॉट्सऍपने काय तयारी केली आहे. याची शहानिशा रिझर्व्ह बॅंकेकडून करण्यात येत आहे. याबाबत पूर्ण खात्री झाल्यानंतरच या समाजमाध्यम कंपनीला पेमेंट सेवा सुरू करण्यास परवानगी दिली जाणार आहे.