पुणे – आपण स्वत: उपनगरांमधील पक्षाच्या नगरसेवकांची भेट घेणार आहे. त्यांच्या तक्रारी जाणून घेऊन त्यांच्या अगदी छोट्या विषयांमध्येही लक्ष घालणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
पाटील यांनी कोथरूड मतदारसंघातील आणि शहरातील अन्य प्रश्नांसंदर्भात महापालिका आयुक्तांची भेट घेतली. त्यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, सभागृह नेते गणेश बिडकर, आमदार मुक्ता टिळक, आमदार सिद्धार्थ शिरोळे आदी उपस्थित होते. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
भाजपचे उपनगरांतील बरेच नगरसेवक उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांना भेटत आहेत. तसेच, त्यांच्याकडे समस्या मांडत आहेत. या याविषयी पाटील म्हणाले, असे काही नाही. उपनगरातील प्रत्येक नगरसेवकाला भेटून, त्यांचे म्हणणे ऐकून घेत आहे. त्यामुळे ते लांब जातील, असे काही चित्र नाही.
पुण्यातील झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न गेल्या दीड वर्षांपासून प्रलंबित असून, त्यासाठी एसआरएच्या नियमावलीत सुधारणांची आवश्यकता आहे. या सुधारणांची फाईल मुख्यमंत्र्यांच्या टेबलावर असल्याचे समजले आहे. त्याच्या मान्यतेसाठी टोकाचा पाठपुरावा करणार असल्याचे, पाटील म्हणाले.
पुण्यात टीडीआरचे दर कमी झाल्याने विकासकांना त्यांच्या प्रकल्पांची उंची वाढवण्याची परवानगी दिली नाही, तर अशा परिस्थितीत विकासक नव्या प्रकल्पांकडे पाठ फिरवतात. त्यामुळे प्राधिकरणाच्या नव्या नियमावलीत त्याचा अंतर्भाव करण्यात आला आहे. त्यामुळे त्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिल्यास, पुण्यातील प्रलंबित झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागेल, असेही पाटील म्हणाले.
मेट्रोचे पाच मार्ग डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण करणार असून, त्यातील एका मार्गावर मार्चपासून मेट्रो धावू शकेल, असा मेट्रो अधिकाऱ्यांचा दावा आहे. त्याशिवाय कोथरुडमधील नळस्टॉप चौकातील डबल डेकर उड्डाणपूलाचे कामही वेगाने सुरू असून, जून 2021 पर्यंत तो पूर्ण होऊन त्याचे लोकार्पण होईल, असाही दावा मेट्रो प्राधिकरणाचा आहे. त्यामुळे मेट्रो आणि उड्डाणपूलाचे काम पूर्ण झाल्यास पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल, असे पाटील म्हणाले.