सोमवारपासून अधिवेशन; शास्तीकर, अनधिकृत बांधकामांचा प्रश्न
पिंपरी – राज्यात आघाडी सरकार आल्यास अनधिकृत बांधकाम आणि शास्तीकराचा प्रश्न तत्काळ मार्गी लावू, असे आश्वासन देणाऱ्या अजित पवारांकडून आश्वासनाची पूर्ती होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 24 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात अजित पवार यांनी हा विषय मार्गी लावावा, यासाठी स्थानिक राष्ट्रवादीकडून आग्रही मागणी केली जात असली तरी अजित पवारांनी याची दखल घेतील का? हे पाहणेदेखील औत्सुक्याचे ठरणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे आणि शास्तीकराचा प्रश्न भिजत ठेवल्यामुळे राष्ट्रवादीला महापालिकेतील सत्तेतून बाहेर व्हावे लागले होते. तर शहरात या पक्षाची मोठी नाचक्की झाली होती. 2014 च्या निवडणुकीत या पक्षाचा एकही आमदार शहरातून निवडून आला नव्हता. तर 2019च्या विधानसभा निवडणुकीत पिंपरी वगळता इतर दोन मतदारसंघात या पक्षाला उमेदवार न मिळाल्याने इतरांना पुरस्कृत करावे लागले होते.
विधानसभा निवडणूक प्रचारात अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षावर टीका करताना राज्यात आघाडीचे सरकार आल्यास सरसकट शास्तीकर माफी दिली जाईल तसेच अनधिकृत बांधकामांचा प्रश्न मार्गी लावला जाईल, असे आश्वासन दिले होते. सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे शहरवासीयांच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत, आता पवार विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा प्रश्न मार्गी लावणार का, याकडे लक्ष लागले आहे.