जुन्याच वादग्रस्त सल्लागार कंपनीच्या थेट नियुक्तीचा स्थायीसमोर प्रस्ताव
पिंपरी – पिंपरी -चिंचवड शहरासाठी बंदिस्त पवना जलवाहिनी प्रकल्पाचे काम पुन्हा हाती घेण्यात येत आहे. मात्र, या प्रकल्पास तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिलेली स्थगिती अद्याप उठविण्यात आलेली नाही. तरीही निविदा प्रक्रिया न राबविता वादग्रस्त जुन्याच सल्लागार कंपनीची थेट नियुक्ती करण्याचा प्रस्ताव पाणी पुरवठा विभागाने स्थायी समितीसमोर ठेवला आहे. तसेच जुन्याच ठेकेदाराला हे काम देण्यात येणार असल्याने पुन्हा वादाला तोंड फुटणार आहे.
पवना जलवाहिनी प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू करण्याबाबत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे महापालिका पाणीपुरवठा विभागानेही तयारी सुरू केली असून, सुधारित प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती प्रस्ताव येत्या स्थायी समितीसमोर ठेवला आहे. विशेषता नव्याने निविदा प्रक्रिया न करता पूर्वीच्याच ठेकेदाराने प्रकल्पाचे काम करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे पूर्वीच्याच सल्लागाराचीही नियुक्ती अहवाल तयार करुन त्या सल्लागार कंपनीची थेट नियुक्ती केली जाणार आहे.
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणातून बंदिस्त जलवाहिनीतून प्राधिकरणाच्या सेक्टर 23 मधील जलशुध्दीकरण केंद्रात पाइपलाईनद्वारे पाणी आणण्यात येणार आहे. त्यासाठी अठराशे मिलीमीटर व्यासाच्या दोन समांतर जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. संयुक्त भागीदारीत ठेकेदार नियुक्त केला आहे. मात्र, शेतकऱ्यांनी विरोध करीत 9 ऑगस्ट 2011 मध्ये आंदोलन केले होते. त्या वेळी झालेल्या गोळीबारात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून हे काम बंद आहे.
त्यानंतर संबंधित ठेकेदाराने न्यायालयाकडून सदरील कामावर स्थगिती आदेश आणून काम पूर्ण केल्याची बिले अदा करण्यासाठी महापालिकेला नोटीस दिली होती. त्यानुसार महापालिकेने पाइप एकत्रित करण्यास सुमारे 80 लाखांचे टेंडर काढून सर्व पाइप एकत्रित करुन आणले होते. तसेच त्या ठेकेदारांची बिले देखील अदा करण्याची तयारी करण्यात आली.
परंतु, दरम्यानच्या काळात पवना जलवाहिनीचे काम पुन्हा सुरू करण्याबाबत हालचाली सुरु झाल्या. त्याकरिता शासनस्तरासह महापालिका आयुक्तांच्या दालनात देखील बैठक झाली. त्यानंतर पवना जलवाहिनी प्रकल्प नव्याने राबविण्यासाठी जुन्याच ठेकेदाराने काही अटी-शर्थीसह काम करण्यास तयारी दर्शविली. याशिवाय पूर्वीच्याच सल्लागार कंपनीला कामाचा अनुभव असल्याने त्यांची नियुक्तीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. याबाबत नव्याने निविदा प्रक्रिया न राबविल्याने हा प्रकल्प पुन्हा वादात अडकण्याची दाट शक्यता आहे.
आयुक्तांच्या बैठकीत काय ठरले?
पवना जलवाहिनी प्रकल्पासाठी जुन्या ठेकेदारांचा प्रतिनिधी उपस्थित होता. त्यानुसार त्याच ठेकेदारासह सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याशिवाय पूर्वीचे पुरवठा केलेले पाइप, पंप्स व व्हॉल्वची गुणवत्ता तपासणे, यापूर्वी टाकलेल्या पाइपची सद्यःस्थिती व गुणवत्ता तपासणे, पवना धरण ते सेक्टर 23 पर्यंत ड्रोन सर्वे करून अहवाल करणे, सध्याच्या बाजारभावानुसार कामाचा सुधारित प्रकल्प अहवाल व अर्थसंकल्प तयार करणे, कामाचा आराखडा करण्यासाठी जुन्याच सल्लागाराची पुन्हा नेमणूक केली जाणार आहे. यावर सविस्तर चर्चा होवून त्यास समंती देण्यात आलेली आहे.
‘त्या’ सल्लागारास जुनी फी अदा करावी लागणार?
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडील अपुऱ्या मनुष्यबळा अभावी हे काम स्वतंत्र सल्लागार कंपनीकडून करून घ्यावे लागणार आहे. त्याकरिता जुन्याच युनिटी कन्सलंटन्ट या सल्लागार कंपनीची थेट नियुक्ती करण्यात येत आहे. सदरील ठेकेदाराला यापूर्वी केलेल्या कामांची 75 कोटींची बिले व अन्य दाव्यांची रक्कम द्यावी लागणार आहे.
प्रकल्पाची संक्षिप्त सद्यःस्थिती…
एकूण लांबी : 69.69 किलोमीटर
पाइप पुरविले : 34.71 किलोमीटर
महापालिका हद्दीत लांबी : 6.4 किलोमीटर
काम पूर्ण : 4.4 किलोमीटर
दोन समांतर जलवाहिन्या : 8.8 किलोमीटर
जलवाहिन्यांचा व्यास : 1800 मिलिमीटर
ठेकेदार कंपनी : एनसीसी-एमएमसी-इंदू
प्रकल्प सल्लागार : युनिटी कन्सलटन्ट (युनिटी आय ई वर्ल्ड)