पारनेर विधानसभा मतदार संघामध्ये लंके बाजी मारणार?

शशिकांत भालेकर
पारनेर – पारनेर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. मतदानाला अवघे तीन दिवस उरले आहेत. त्या अनुषंगाने उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. निवडणुकीत राष्ट्रवादीकडून नीलेश लंके व शिवसेनेकडून विजय औटी हे रिंगणात आहेत. लंके मतदारसंघात बाजी मारतात का विजय औटी हेच पुन्हा विजयाला आपलंसं करतात, हे निकालानंतर स्पष्ट होईल.

विधानसभेच्या अनेक निवडणुका तालुक्‍यामध्ये वेगवेगळ्या विषयांवर लढवल्या गेल्या. गत दोन निवडणुकांमध्ये तर मतविभागणीचा फायदा आमदार औटी यांना झाला. त्यावेळी तिरंगी, चौरंगी अशा लढती झाल्या. परंतु या वेळेस या मतदारसंघांमध्ये सहा उमेदवार रिंगणात असले, तरी खरी लढत राष्ट्रवादी व शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये आहे. त्यामुळे सत्तेवर असणाऱ्या शिवसेनेच्या औटी यांना संघर्ष करावा लागत आहे. थेट लढत असल्यामुळे मतविभागणीचा जास्त परिणाम होणार नसून, दोनच उमेदवारांमध्ये सध्या रणसंग्राम रंगला आहे.

या मतदारसंघात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना मानणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत. तरुण, महिला व मध्यमवर्ग यामध्ये लंके यांचा चांगला संपर्क आहे. त्यामुळे शिवसेनेचे विद्यमान आमदार औटी यांना मतदारसंघामध्ये आपण केलेल्या कामांचा लेखाजोखा मतदारांपर्यंत पोचवा लागत आहे. तसेच भविष्यामध्ये राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळवू, असे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येते. त्यामुळे तालुक्‍याचा विकास होऊ शकतो, यावर त्यांनी प्रचाराचा भर दिला आहे.
या निवडणुकीत सेना-भाजप युती असल्याने खासदार विखे युती धर्म पाळतील, अशी भूमिका खासदार सुजय विखे यांची असेल.

उद्धव ठाकरे यांच्या सभेमध्ये तसे त्यांनी सांगितले आहे. मात्र त्यानंतर खा. विखे हे तालुक्‍यात सध्या दिसत नाही व त्यांचेच तालुक्‍यातील खंदे समर्थक व यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये महत्त्वाची भूमिका आमदार औटी यांच्या बाजूनी पार पाडणारे माजी आ. नंदकुमार झावरे हे औटी यांच्यावर नाराज असल्याने त्यांनी या निवडणुकीमध्ये वेगळा पर्याय निवडला असल्याचे बोलले जात असून, ते लंके यांना सध्या तरी साथ देत असल्याची तालुक्‍यात चर्चा आहे.

खासदार विखे यांची देखील भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे का, असा संशय व्यक्त करण्यात येत असून, नंदकुमार झावरे यांच्या भूमिकेनंतर विखे यांची भूमिका काय? हे समजू शकले नाही. येथे प्रवरेचा आशीर्वाद महत्त्वाचा मानला जात असून, त्याच उमेदवाराचे पारडे जड असते, असा इतिहास आहे, याचादेखील या मतदारसंघांमध्ये मोठा परिणाम होऊ शकतो.

2004 ध्ये झाली होती दुरंगी लढत

पारनेर तालुक्‍यांमध्ये याआधी दुरंगी लढत 2004 च्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार कै. वसंतराव झावरे व विजय औटी यांच्यात झाली होती. त्यावेळी आ. विजय औटी यांनी बाजी मारली. कै. झावरे हे दहा वर्षे आमदार असूनही त्यांचा पराभव औटी यांनी केला होता. कै. झावरे यांच्या विरोधात तालुक्‍यातील मातबर एकत्र होऊन आमदार औटी यांना पाठिंबा दर्शवला होता. तसेच विखे गटाची देखील मोठी मदत त्यावेळी आमदार औटी यांना झाल्याने ते शिवसेनेकडून प्रथमच विजयी झाले होते. यावेळीही अशी जादू होते काय, याकडे लक्ष लागले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)