जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची कोथरूड येथील निवासस्थाने मरणासन्न
पुणे – कोथरुड येथील जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची दुरवस्था झाली असून, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जात राहावे लागत आहे. त्याबाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही ठोस निर्णय घेतला जात नाही. प्रशासनाने मनावर आणले आणि किमान दुरूस्ती केली, तरी कर्मचाऱ्यांच्या थोड्याफार समस्या सुटतील, अशा भावना व्यक्त होत आहेत.
दिवसभर जिल्ह्यातून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यालयात येणाऱ्या नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, त्यांची कामे करून देण्यासाठी कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू असते. काही विभागात कर्मचारी संख्या कमी असतानाही, आहे त्या मनुष्यबळातच कामाचा निपटारा केला जात आहे. मात्र, काम करून घरी गेल्यावर नजरेसमोर येते ते इमारतीची दुरवस्था. घराच्या खिडक्यांचा काचा फुटलेला, रंग उडालेले, फरशी तुटलेली, वायर्स तुटलेले अशी परिस्थिती झाली असून, सुरक्षेचा गंभीर प्रश्न आहे. आजूबाजूच्या परिसरात कचरा असल्यामुळे आरोग्याचीही समस्या उद्भवते.
दरम्यान, पाच ते सहा महिन्यांपूर्वी याच इमारतीमधील एका कर्मचाऱ्यांच्या पत्नीचा डेंग्यूने मृत्यू झाला होता. तसेच अनेकांना डेंग्यूची लागण झाली होती. त्यानंतर तरी जिल्हा परिषद प्रशासन जागे होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली. कर्मचारी सोसायटीमधील ड्रेनेजचे सर्व पाइप गळत आहेत. ड्रेनेजचे पाणी बेडरुमपर्यंत जात असून, सदनिकांमधील शौचालयाच्या फरशा फुटल्या आहेत. तसेच दरवाजेही तुटले. याठिकाणी तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, ते फक्त पाणी पुरवठ्यासाठी येतात. सोसायटीमध्ये सुरक्षा रक्षकांचाही प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे प्रशासनाने सुरक्षा आणि आरोग्यासाठी तरी प्राथमिक कामे मार्गी लावावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.