पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात सकाळी आणि सायंकाळी व्यायायामासाठी आणि फिरायला जाणाऱ्या नागरिकांना आता शुल्क भरून सदस्यत्व घ्यावे लागणार आहे. याबाबतचे परिपत्रक आज विद्यापीठ प्रशासनाने प्रसिध्द करताच त्यास विद्यार्थी संघटनेने जोरदार विरोध केला आहे. विद्यापीठाने परिपत्रक मागे न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
‘एसपीपीयू ऑक्सि पार्क’ या योजनेअंतर्गत विद्यापीठात व्यायामाला, फिरायला जाणाऱ्या दर महिना एक हजार रुपये शुल्क आकारले जाणार असून, शुल्क भरून सदस्यत्व घेणाऱ्यांना विद्यापीठाकडून विविध सुविधा पुरवल्या जाणार आहेत.
‘एसपीपीयू ऑक्सि पार्क ’ या योजनेअंतर्गत विद्यापीठाच्या आवारात व्यायामासाठी आणि फिरायला जाणाऱ्या नागरिकांसाठी सदस्यत्वाचे तीन टप्पे करण्यात आले आहेत. त्यानुसार मासिक शुल्क १हजार रुपये, सहामाही शुल्क साडेपाच हजार रुपये आणि वार्षिक शुल्क १० हजार रुपये भरून सदस्यत्व घ्यावे लागेल. सदस्यत्वाचे ओळखपत्र विद्यापीठाकडून दिले जाईल.
९ ते १६ वयोगटातील मुलांना सदस्यत्व शुल्क नसून, नोंदणी आणि ओळखपत्रासाठी पाचशे रुपये भरावे लागतील. अल्प उत्पन्न गटासाठी ५० टक्के सवलत दिली जाईल. स्वसाक्षांकित प्रमाणपत्र देणाºया दिव्यांग व्यक्तींना विनाशुल्क प्रवेश दिला जाईल. पहाटे साडेचार ते सकाळी आठ, सायंकाळी साडेसहा ते आठ या वेळेत नागरिकांना त्यांचे सदस्यत्वाचे ओळखपत्र पाहून प्रवेश दिला जाईल.
एसपीपीयू ऑक्सि पार्क च्या सदस्यांना आपत्कालीन वैद्यकीय सुविधा, रुग्णवाहिका, खुली व्यायामशाळा, विद्यापीठातील क्रीडा सुविधांमध्ये सवलत, जयकर ग्रंथालयाच्या सदस्यत्व शुल्कात सवलत आदी सुविधा दिल्या जाणार असल्याचे परिपत्रक कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी काढले आहे.