पक्षविरोधी कारवाया खपवून घेणार नाही

भाजपाच्या आमदारांनी घेतली पालिकेत नगरसेवकांची हजेरी

पिंपरी – विधानसभेची निवडणूक झाली आता नगरसेवक पदासाठी पुढील दोन वर्षांनी तुमची निवडणूक येणार आहे. तुम्हाला जनतेला सामोरे जावे लागणार आहे. लोकांचे प्रश्‍न सोडविण्यावर भर द्या. पक्षाची प्रतिमा मलीन होणार नाही, याची काळजी घ्या. पक्षविरोधी भूमिका खपवून घेणार नाही. संबंधितांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल, अशी ताकीद भाजपच्या दोन्ही आमदारांनी आज स्वपक्षीय नगरसेवकांना दिली.

महापालिका भवनात भाजप पदाधिकारी व नगरसेवकांच्या झालेल्या या बैठकीला शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी तसेच, भाजपचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. बैठकीमध्ये विधानसभेवर आमदार म्हणून पुन्हा निवड झाल्याबद्दल जगताप आणि लांडगे यांचा सत्कार करण्यात आला.

बैठकीमध्ये दोन्ही आमदारांनी नगरसेवकांना विविध सूचना केल्या. विधानसभेची आमची निवडणूक झाली आहे. आता पुढील दोन वर्षाने महापालिकेची निवडणूक येणार आहे. त्यासाठी आत्तापासूनच कामाला लागा. वॉर्डाची निवडणूक ही महत्त्वाची आहे. लोकांचे प्रश्‍न सोडविण्यावर भर द्या. पक्षाची प्रतिमा मलीन होणार नाही, याची काळजी घ्या. तुमच्या काही तक्रारी असतील तर आमच्याकडे या. प्रेसकडे जाऊ नका, असे आमदारांनी बैठकीत स्पष्ट केले.

चोवीस तास पाणीपुरवठा योजना गरजेची
शहरामध्ये सध्या काही भागांमध्ये अपुरा, कमी दाबाने आणि अनियमित पाणीपुरवठा होत आहे. चढावरील भागात राहणाऱ्या नागरिकांना तुलनेत कमी पाणी मिळत आहे. चोवीस तास पाणीपुरवठ्याची योजना झाल्यानंतर शहरात समान पाणी वाटपासाठी त्याचा फायदा होईल. तसेच, नागरिकांना पुरेसे पाणी मिळू शकेल. त्यामुळे या योजनेत अडथळा आणू नका. भाजपमधील संघटनात्मक निवडणुकांसाठी सदस्य संख्या वाढविण्यावर भर द्या, अशा विविध सूचना आमदारांनी केल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.