महिलांचा अपमान सहन करणार नाही – रूपाली चाकणकर

कोरेगाव भीमा  -प्रवीण दरेकरांनी समस्त महिलांची माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष महिलांचा अपमान करणाऱ्यांचे गाल रंगवू शकतो ती ताकद महाराष्ट्रातील रणरागिणींच्या मनगटात आहे, असा जोरदार प्रतिहल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाला चाकणकर यांनी केला.

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काल शिरूर येथे क्रांतीकारक उमाजी नाईक जयंती कार्यक्रमात महाविकास आघाडीवर केलेल्या टीकेचा खरपूस समाचार चाकणकर यांनी घेतला. नगर दौऱ्यावर जात असताना सणसवाडी (ता. शिरूर) येथे थांबल्या असता दैनिक प्रभातशी त्यांनी खास संवाद साधला. यावेळी प्रवीण दरेकर यांच्या “राष्ट्रवादी कॉंग्रेस हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष’ या वक्तव्याचा त्यांनी खरपूस समाचार घेतला.

चाकणकर म्हणाल्या, शक्‍ती कायदा लवकरात लवकर अंमलात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करीत आहोत. कायदा कठोर आहे. पोलीसही त्याबाबतीत चांगले काम करतात पण पोलीस आणि कायद्यावर जबाबदारी टाकून आपण हात वर करणार आहोत का? असा प्रश्‍न उपस्थित करत जन्मदाता बाप, भाऊच जर अत्याचार करीत असतील तेव्हा संस्कार जातात कुठे, नात्यांची जाण राहिली नाही.

यासाठी कायद्यापेक्षा समाजाची मानसिकता बदलायला हवी. कायदा, सुव्यवस्था, प्रशासन व समाज यांनी एकत्रित काम करायला हवे. वयात येणाऱ्यांच्या मनामध्ये सभोवतालच्या घटनांचे पडसाद उमटतात म्हणून केंद्र सरकारने विकृत दर्शन देणाऱ्या वेब सिरीज, पोर्नोग्राफी यांना तातडीने बंद करून समाजाला दिशा द्यावी.

चित्रा वाघ यांच्याबाबत बोलताना चाकणकर म्हणाल्या, ज्यांनी लाचखोरीचा आरोप आणि त्यातून वाचण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला त्यांनी दुसऱ्यांना नैतिकता आणि नीतिमत्ता सुचवू नये. राष्ट्रवादीत असताना भाजप बलात्कारी पक्ष म्हटल्या, भाजपमध्ये गेल्यावर माहविकास आघाडी पक्ष बलात्काऱ्यांचा पक्ष आहे, असे म्हणता. त्यांनी आपल्या मतावर ठाम असावं. जिकड खोबरं तिकडे चांगभलं करू नये.

रूपाली चाकणकरांनी सावता परिषदेचे जिल्हाध्यक्ष गोरक्ष भुजबळ यांच्या घरी भेट देत गणपतीची आरती केली. यावेळी भुजबळ कुटुंबात, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण पहावयास मिळाले.

चाकणकर यांनी महिलांशी संवाद साधत त्यांना सामाजिक कार्य व सामाजिक बांधिलकी याबाबत मार्गदर्शन केले. ग्रामपंचायत कामकाजामध्ये पतिराज येऊ देऊ नका, असा सल्ला द्यायलाही त्या विसरल्या नाहीत.

यावेळी सरपंच सुनंदा नवनाथ दरेकर, उपसरपंच विजयराज दरेकर, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर, सावता परिषदेचे जिल्हाध्यक्ष गोरक्ष भुजबळ, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र दरेकर, सुवर्णा रामदास दरेकर, शशिकला सातपुते, रूपाली दरेकर, संगीता हरगुडे, स्नेहल भुजबळ, नवनाथ हरगुडे, वंदना दरेकर, माजी सरपंच गीता भुजबळ, माजी सदस्य दत्तात्रय हरगुडे, सुनीता दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रवीण दरेकर यांच्या वक्तव्यावरून त्यांचे अभ्यासाशी व वैचारिकतेशी दूरदूर संबंध दिसत नाही. त्यांच्या मनामध्ये जे आहे ते बोलण्यातून दिसून आले. त्यांच्या तोंडातून जी घाण टपकत होती, त्यावरून भाजपचा विचारांचा वारसा व संस्कृती पाहायला मिळाली. आपल्या बोलण्यातून वैचारिक दरिद्रता दिसून आली.
-रूपाली चाकणकर, महिला प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंगेस

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.