नगर – शिक्षकांविषयीची अवमानकारक भाषा खपवून घेणार नाही

प्राथमिक शिक्षक संघटनांचा इशारा; जिल्हा परिषद सदस्याविषयी तीव्र नाराजी

नगर  – नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये एका सदस्याने ‘शिक्षकांनी घरभाडे भत्ता लाटला’, असा आरोप केला. शिक्षक समितीचे पदाधिकारी असलेल्या या सदस्याच्या मनात शिक्षकांविषयी कायम द्वेषपूर्ण भावना असल्याने त्यांच्या तोंडी अवमानकारक भाषा असते. ती यापुढे खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा प्राथमिक शिक्षक संघटनांनी एकत्र येवून दिला आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात समन्वय समितीने म्हटले आहे की, शिक्षकांविषयी कायम अवमानकारक भाषा वापरणार्‍या या सदस्यास समज द्यावी. अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल.

राज्यात कुठल्याच जिल्हा परिषदेत घडत नाहीत, अशा अनेक बाबी समोर आणून फक्त आपल्याच जिल्ह्यात शिक्षकांचा जाहीर अवमान केला जातो, अशी भूमिका संघटनांनी निवेदनात स्पष्ट केली आहे.
विद्यार्थी व गुणवत्तेसाठी प्रशासन अथवा पदाधिकार्‍यांनी सुचविलेली धोरणे आम्ही राबवतो. शिक्षक ऐकतात याचा अर्थ प्रत्येक सभेत त्यांचा अवमान करण्याचा हक्क कुणाला मिळालेला नाही.

घरभाड्याचा प्रश्न राज्य सरकारशी संबधित आहे. त्याचा कायदेशीर निर्णय असेल, तो घेण्यास आमची हरकत नाही. पण कोविड योद्धा म्हणून काम केलेल्या शिक्षकांनी घरभाडे लाटले, असा शब्दप्रयोग वापरुन या सदस्यांनी शिक्षकांविषयी असलेल्या असूयेचे दर्शन घडविले आहे. आई-वडिलांचा सांभाळ न करणार्‍या कर्मचार्‍यांच्या वेतनातून तीस टक्के कपात करण्याच्या ठरावाचे आम्ही स्वागत करतो. याची अंमलबाजवणी करताना तक्रार आलेल्या कर्मचार्‍याच्या कुटुंबाची सर्व बाजूने बारकाईने चौकशी करावी. ज्याला वेतन आहे, त्याला नियम लावता येईल. परंतु इतरांनीही ही नैतिकता बाळगावी असेही निवेदनात म्हटले आहे.

शिक्षक नेते डॉ. संजय कळमकर, आबासाहेब जगताप, रा. या. औटी, राजेंद्र शिंदे, प्रवीण ठुबे, संजय धामणे, आबा लोंढे, राजू रहाणे, विकास डावखरे, जावेद सय्यद, राजेंद्र ठोकळ, एकनाथ व्यवहारे, रहेमान शेख, बाळासाहेब सालके, विजय महामुनी, दादा वाघ, मधुकर मैड, विजय जाधव, प्रताप पवार, मधुकर रसाळ, विजय लंके, बाळासाहेब देंडगे, चंद्रकांत शिंदे, कैलास ठाणगे, नाना गाढवे, शिवाजी काकडे आदींसह अन्य शिक्षक नेत्यांच्या निवेदनावर सह्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.