नवी दिल्ली : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी माझ्यावर भरपूर टीका केली. पण, त्यांच्या वक्तव्यांवरून मी कुठले प्रत्युत्तर देणार नाही. त्यांची लढाई कॉंग्रेसला वाचवण्यासाठी आहे. तर, माझी लढाई देशाला वाचवण्यासाठी आहे, असे भाष्य आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केले.
विधानसभा निवडणुकीमुळे दिल्लीतील राजकीय वातावरण तापू लागले आहे. अशात राहुल यांची सोमवारी कॉंगेसच्या प्रचारासाठी पहिली सभा झाली. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप यांच्यासह केजरीवाल यांच्यावरही टीकेची झोड उठवली. कॉंग्रेस आणि आप हे विरोधी पक्षांच्या राष्ट्रीय स्तरावरील इंडिया आघाडीचे घटक आहेत. मात्र, ते दिल्लीतील रणसंग्रामात एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत.
आप सत्ताधारी पक्ष असल्याने राहुल यांनी टीका करण्याला स्वाभाविक मानले जात आहे. मात्र, प्रत्युत्तर न देण्याच्या केजरीवाल यांच्या भूमिकेने भुवया उंचावल्या गेल्या आहेत. त्यातून दिल्ली रणसंग्रामात कॉंग्रेसला प्रतिस्पर्धी म्हणून अधिक महत्व न देण्याची आपची रणनीती सूचित होत आहे.
दिल्लीत आप आणि भाजपमध्येच खरी लढत होणार असल्याचे वक्तव्य केजरीवाल यांनी याआधीच केले होते. मागील २ विधानसभा निवडणुकांत कॉंग्रेस पक्ष दिल्लीत खातेही उघडू शकला नव्हता.