देशाची विभागणी करू देणार नाही ; अब्दुल्ला आणि मुफ्ती यांना मोदींचा इशारा

कथुआ (जम्मू काश्‍मीर): जम्मू काश्‍मीरमध्ये अब्दुल्ला आणि मुफ्ती या दोन्ही कुटुंबांच्या तीन पिढ्यांनी राज्य केले आहे. या घराण्यांना जम्मू काश्‍मीरची विभागणी करू दिली जाणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिला. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी काही दिवसांपूर्वी जम्मू काश्‍मीरसाठी स्वतंत्र पंतप्रधान असावेत, अशी मागणी केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान बोलत होते.

अब्दुल्ला आणि मुफ्ती या घराण्यांच्या तीन पिढ्यांनी जम्मू काश्‍मीरची नासाडी झाली आहे. आता जम्मू काश्‍मीरच्या उज्ज्वल भविष्यासाठी या दोन्ही घराण्यांना पराभूत करणे गरजेचे आहे. या दोन्ही घराण्यांना घालवल्यासच जम्मू काश्‍मीरला चांगले भविष्य असू शकेल. ही दोन्ही घराणी आपल्या संपूर्ण कुटुंबाला राजकारणात आणतील. जेवढे शिव्याशाप द्यायचे तेवढे देतील. मात्र ते देशाची विभागणी करू शाणार नाहीत, असे पंतप्रधान म्हणाले.
जम्मू काश्‍मीरमधील उधमपूर लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह हे निवडणूकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये मोदी बोलत होते.

निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये जम्मू काश्‍मीरमधील जनतेने भरभरून मतदान केले आहे. त्यामुळे दहशतवाद्यांचे नेते आणि संधीसाधू राजकारणी हादरले आहेत. “महामिलावट’आघाडीचेही नैतिक खच्चीकरण झाले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. जम्मू काश्‍मीरच्या जनतेमुळे देशाची लोकशाही अधिक सशक्त झाली आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी कॉंग्रेसवरही जोरदार टीका केली. कॉंग्रेसच्या जाहिरनाम्यामध्ये काश्‍मीरमधील “ऍफ्स्पा’ कायदा हटवण्याचे आश्‍वासन दिले गेले आहे. एखादा देशभक्‍त असे म्हणूच शकणार नाही. सुरक्षा दलांना संरक्षण असायला नको का ? असा प्रतिप्रश्‍न त्यांनी विचारला.

कॉंग्रेसने जालियनवाला बाग हत्याकांडाच्या शतब्दीचेही राजकारण केल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला. उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत जालियनवाला बागेत झालेल्या शासकीय कार्यक्रमाला पंजाबचे मुख्यमंत्री अनुपस्थित राहिले होते. अमरिंदर सिंग यांच्या देशभक्तीवर आपला संशय नाही. मात्र “परिवार भक्‍ती’मुळे त्यांचा नाईलाज झाला असावा, असे पंतप्रधान म्हणाले.

“सर्जिकल स्ट्राईक’ आणि “एअर स्ट्राईक’वर कॉंग्रेसच्यावतीने उपस्थित केल्या गेलेल्या शंकांबाबत बोलताना पंतप्रधानांनी कॉंग्रेसला कधीही भारतीय लष्कराबाबत विश्‍वासच वाटला नसल्याची टीका केली. कॉंग्रेससाठी लष्कर म्हणजेपैसे कमावण्याचा मार्ग आहे. काश्‍मीरी पंडीतांना कॉंग्रेसमुळेच परागंदा व्हावे लागले आणि भाजप त्यांना त्यांच्या भूमीत पुन्हा वसवण्यासाठी वचनबद्ध आहे. कॉंग्रेसला व्होटबॅंकेची चिंता आहे. काश्‍मीरी पंडीतांवरील अन्याय त्यांना दिसत नाही. 1984 सालच्या शिखविरोधी दंगलीचा उल्लेखही पंतप्रधानांनी केला. “न्याय’देण्याचे आश्‍वासन देऊन कॉंग्रेस लोकांचा विश्‍वासघात करत आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.