कोणावरही अन्याय होऊ देणार नाही : उदयनराजे

खंडाळा तालुका राजेंसोबतच राहणार असल्याची एकमुखी ग्वाही

खंडाळा – खंडाळा तालुक्‍यातील जनता गेल्या दोन लोकसभा निवडणुकांप्रमाणे याही निवडणुकीत उदयनराजे भोसले यांच्या सोबत राहिल, अशी एकमुखी ग्वाही ज्येष्ठ नेते शंकरराव गाढवे यांनी उदयनराजे यांच्या खंडाळा येथील प्रचार बैठकीत बोलताना दिली.

उदयनराजे म्हणाले, उद्योगांमध्ये स्थानिकांना रोजगारासाठी प्राधान्य मिळाले पाहिजे. आजपर्यंत मी येथील भूमिपुत्रांसाठी लढा दिला. अजून कितीही खटले माझ्यावर पडले तरी मी मागे हटणार नाही. कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. या भागाचा पाणी प्रश्‍न सोडवण्यासाठी मी पुढाकार घेऊन पाठपुरावा करेन, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व मित्रपक्षांचे सातारा लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ खंडाळा तालुक्‍यात विविध ठिकाणी प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका झाल्या. त्यात खंडाळा येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
याप्रसंगी उदयनराजे भोसले, शंकरराव गाढवे, प्रल्हाद खंडागळे, दत्ता गाढवे, युवराज गाढवे, नारायणराव पवार, पुंडलिकराव धुमाळ, पांडुरंग आवाडे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील काटकर आदी उपस्थित होते.

दरम्यान, पारगाव येथे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे माजी चेअरमन बकाजीराव पाटील यांच्या निवासस्थानी पंचक्रोशीतील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यात बोलताना खंडाळा तालुक्‍यातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी सर्वांनी उदयनराजे महाराजांच्या पाठीशी एकजुटीने उभे रहावे, असे आवाहन पाटील यांनी व्यक्त केले. चार कोटी 55 लाख लोकांना बेरोजगार करणारे सरकार दोन कोटी युवकांना रोजगार कुठून देणार?, असा सवाल युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी केला. यावेळी संजय पाटील, अजय धायगुडे, अमोल धुमाळ, भूषण शिंदे, जालिंदर पवार आदी उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.