रजपूत झोपडपट्टीतील महिलांनी पालिका कर्मचाऱ्यांना हुसकावून लावले
कोथरुड – रजपूत झोपडपट्टी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या घरांच्या समोर लावण्यात आलेले दगड व फरशा काढण्यासाठी आलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना स्थानिक महिलांनी हुसकावून लावले. आम्ही अनेक वर्षापासून इथे राहत आहोत. पालिकेचा मनमानी कारभार इथे चालू देणार नाही अशी भूमिका येथील महिलांनी घेतल्याने अधिकाऱ्यांना परत जावे लागले.
दारातून गेलेल्या अरुंद रस्त्यामुळे सतत वाहनांची वर्दळ असते मुले बाहेर खेळत असताना त्यांना वाहनांचा धक्का लागू नये म्हणून घराच्या समोर महिलांनी फरशा व दगड लावले आहेत. शनिवारी अचानक पालिकेचे कर्मचारी जेसीबी घेऊन आल्याने स्थानिक महिलांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले.
कोथरुड कडून येणारे दुचाकी चालक नदी पात्रातून शहरात येण्यासाठी व परत जाण्यासाठी रजपुत झोपडपट्टीतील रस्त्याचा वापर करत असतात. झोपडपट्टीतील हा रस्ता खासगी असतानाही नागरिकांच्या सोयीसाठी त्याचा सार्वजनिक वापर सुरू आहे. मुळात नदीपात्रातील शिवणे खराडी रस्ता हा म्हात्रे पुलाखालून पुढे डीपी रस्त्याला जोडणे आवश्यक असताना रजपूत झोपडपट्टीतील रस्त्यावर वाहतुकीचे प्रयोग केले जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी म्हात्रे पुलाखालील रस्ता केला जात नसल्याचा आरोप मनसेचे शहर उपाध्यक्ष राम बोरकर यांनी केला आहे. महापालिका नक्की नागरिकांची आहे का खासगी बांधकाम व्यावसायिकांची असा प्रश्न आता या परिसरातील नागरिक उपस्थित करत आहेत.