मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे सध्या हा मतदारसंघ चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. या जागेवरून महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर माघार घेण्याच्या तयारीत नाहीत. यावरच त्यांनी आज पुन्हा एकदा भूमिका स्पष्ट केली आहे. सदा सरवणकर यांनी आज माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला यावेळी त्यांनी मी कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही.
मी विधानसभेची निवडणूक लढवणार आहेच, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. मी माघार घेणार नाही. वेळोवेळी सांगितले आहे मागे घेण्याचा प्रश्नच नाही. मला एबी फॉर्म दिलेला आहे. महायुतीचा उमेदवार म्हणून मी एबी फॉर्म भरलेला आहे आणि मी निवडणूक लढवणार आहे. अन्य कोणी माघार घेत असेल तर चौकशी करा, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरेंना खोचक टोला
राज ठाकरे यांनी आगामी मुख्यमंत्रिपदावर भाष्य केले होते. त्यावर बोलताना सरवणकर यांनी राज ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली. ज्याचा एकही आमदार नाही त्यांनी, मुख्यमंत्री कोण होणार हे सांगणे हास्यास्पद आहे. मी त्यांच्यावर टीका करावी असे मला वाटत नाही. मुख्यमंत्री कोण होणार हे महायुती ठरवेल, असे सरवणकर म्हणाले.