मुंबई – ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी रायगडावरील वाघ्या श्वानाचे शिल्प हटवण्यास कडाडून विरोध केला आहे. रायगडावरील वाघ्याचे शिल्प आम्ही हटवू देणार नाही. गरज भासल्यास आम्ही या प्रकरणी कोर्टात दाद मागू, असे त्यांनी म्हटले आहे.
स्वराज्य पक्षाचे प्रमुख आणि माजी खासदार संभाजीराजे यांनी रायगडवरील वाघ्या श्वानाच्या समाधीचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर हाके म्हणाले, संभाजीराजे यांनी वाघ्या श्वानाच्या स्मारकाप्रकरणी सरकारला 31 मे चा अल्टिमेटम दिला आहे.
राज्यातील सर्वच ओबीसी बांधवांचा यावर आक्षेप आहे. त्यांनी 31 मे चीच तारीख का निवडली? त्या दिवशी मातोश्री अहिल्यादेवी यांची जयंती आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या गावी आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्यांनी आमच्या प्रयत्नांत अडथळा निर्माण करण्यासाठीच मुद्दाम ही तारीख ठरवली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
संभाजीराजे छत्रपती यांची निवड रायगड प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी किल्ल्याचे संवर्धन करावे. पण ते हे आपले काम सोडून किल्ल्याची नासधूस करत आहेत. ते महाराष्ट्रातील वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे धनगर समाज म्हणून आमचा त्यांना विरोध आहे, असेही ते म्हणाले.