नवे खासदार, आमदार तरी ‘यशवंत’ सुरू करणार का!

हवेलीतील शेतकरी सभासदांनी मतपेटीतून दिली हाक

थेऊर – यशवंत सहकारी साखर कारखान्याची जमीन न विकता केंद्र सरकारकडून पॅकेज आणून कारखाना सुरू करण्यात येईल, असा शब्द माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांनी 2014च्या निवडणुकीत दिला होता. या आश्‍वासनावरच आढळराव पाटील आणि पाचर्णे निवडून आले होते. मात्र, यशवंतच्या शेतकरी सभासदांनी त्यांना घरचा रस्ता दाखविला.

आता, नवनिर्वाचीत खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार अशोक पवार यांनी तरी यशवंत कारखाना सुरू करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावा, कारखान्याची जमीन न विकता कारखाना चालू करून दाखवावा, अशी अपेक्षा शेतकरी सभासद व्यक्त करू लागले आहेत.

थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू करण्यास प्राधान्य देणे हे शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार अशोक पवार यांच्यासाठी राजकीय प्रतिमा जपण्याकरिता अत्यंत गरजेचे ठरणार आहे. कारखान्याची जमीन न विकता चालू झालेला कारखाना उत्तम आर्थिक परिस्थितीत आणून कर्तव्यदक्ष व चांगल्या संचालक मंडळाच्या ताब्यात देणे हे आव्हानात्मक कामही आमदार पवार यांना करावे लागणार आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अशोक पवार हे शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातून चांगल्या मताधिक्‍याने निवडून आले. निवडणुकीमध्ये प्रचार करताना आणि त्यापूर्वीही यशवंत कारखान्याचा मुद्यावर अशोक पवार यांनी जोर दिला होता; त्यामुळे हवेली तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी कमळा ऐवजी घड्याळाच्या चिन्हाला भरभरून प्रतिसाद दिला. या प्रतिसादामुळे आमदारांची नैतिक जबाबदारी वाढली आहे. परंतु, ही जबाबदारी दिसते तेवढी सोपी नाही. कारण, पाचर्णे हे यशवंत सुरू करणारच… या मोठ्या आशेने हवेली तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी पाचर्णे यांना निवडून दिले होते. परंतु, त्यांना ते जमले नाही. भाजपची एकहाती सत्ता असतानाही त्यांनी यशवंत प्रश्‍नी अळमटळम केली. यशवंत कारखाना सुरू व्हावा याकरीता केवळ कारखान्याच्या प्रशासकांमागे घिरट्या घालण्यातच वेळ गेला. मुंबई वाऱ्याही झाल्या; परंतु, काही सत्ताधाऱ्यांनी कारखाना सुरू होण्यात आडकाठी घातली. त्यामुळे तब्बल पाच ते सहा वर्षे कारखाना बंद राहिला. उसाला बाजार मिळाला नाही, वेळेवर तोड मिळाली नाही, गुऱ्हाळवाल्यांनी दादागिरी चालू ठेवली. या सर्व गोष्टींचा राग यशवंत कारखान्याच्या सभासदांनी मनात ठेवल्याने त्याचा परिणाम 2019च्या विधानसभेत दिसून आला. याच कारणातून आता यशवंत कारखाना सुरू होणे गरजेचे ठरणार असून यापार्श्‍वभुमीवर आमदार अशोक पवार यशस्वी ठरणार का? असाही सवाल केला जात आहे.
यशवंत कारखान्याची जमीन विकून किंवा जमीन न विकता कारखाना आहे त्याच ठिकाणी सुरू व्हावा, अशी शेतकरी सभासदांची अपेक्षा आहे. यातील कोणताही पर्याय निवडून कारखाना सुरू करणे ही खूप मोठी जबाबदारी आमदार पवार व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना पार पाडावी लागणार आहे. यामध्ये हे लोकप्रतिनिधी किती यशस्वी होतात, यावर हवेली तालुक्‍यातील आगामी काळातील राजकारणाची दिशा
ठरणार आहे.

पूर्वीचे व आत्ताचे नेते एकसारखेच?
केंद्र सरकारकडून पॅकेज आणून कारखान्याची जमीन न विकता कारखाना सुरू करणे सोपे नाही. फक्त निवडणुकीतील स्टंट म्हणून जर यशवंत कारखान्याचा प्रश्‍न उचलला गेला असेल तर याचा परिणाम खासदार कोल्हे आणि आमदार पवार या दोन नेत्यांबाबत चुकीचे मत निर्माण होईल. कारण, घोडगंगा कारखान्याची आगामी निवडणूक होईपर्यंत यशवंत कारखान्याचा विचारही कुणी करणार नाही, अशीही चर्चा शेतकऱ्यांत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.