पुणे – महापालिकेचे सातत्याने घटत असलेले आर्थिक उत्पन्न आणि कामांबाबत वाढत असलेल्या गैरव्यवहारांच्या तक्रारींमुळे क्षेत्रीय कार्यालयांकडून करण्यात येणाऱ्या नवीन विकासकामांवर पुढील आर्थिक वर्षात संक्रात येण्याची चिन्हे आहेत. त्यानुसार, केवळ देखभाल दुरुस्तीची कामे क्षेत्रीय कार्यालयांकडे ठेवण्याबाबत प्रशासकीय पातळीवर विचार आहे. त्याबाबत नुकतीच बैठक झाली असून अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले. क्षेत्रीय कार्यालयांकडून वर्षभरात तब्बल 500 कोटींची विकासकामे केली जातात.
क्षेत्रीय कार्यालयांकडून 25 लाखांपर्यंतची विकासकामे ही क्षेत्रीय कार्यालयस्तरावर मंजुर केली जातात. त्याचबरोबर जुन्या कामांची देखभाल-दरुस्तीही क्षेत्रीय स्तरावरूनच होतात. पालिकेची एकूण 15 क्षेत्रीय कार्यालये असून त्यातून वर्षाला जवळपास पाचशे कोटी रुपयांची कामे केली जात असल्याचा अंदाज आहे. या कामात बहुतांश कामे नगरसेवकांच्या “स’ यादीमध्ये अंदाजपत्रकात केलेल्या तरतुदीमधील असतात.
मात्र, अनेकदा बहुतांश कामे एकसारखी असून कामांच्या खर्चात फरक असतो, तर अनेक कामे वारंवार व प्रत्येक वर्षी एकाच ठिकाणी केली जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात निधीची उधळपट्टी होत आहे. त्यामुळे अशा कामांना कात्री लावण्यासाठी बैठकीत चर्चा झाली आहे.