नववर्षात सर्वांसाठी लोकल सुरू होणार का?; आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले…

मुंबई – करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक दिवसांपासून लोकल सेवा बंद ठेवण्यात आली होती. परंतू नंतर अत्यावश्यक सेवांच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि आता अनलाॅकच्या टप्प्यात महिला प्रवाशांसाठीही लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा केंव्हा सुरू होईल हा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे.

यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, “पोस्ट न्यू ईयर करोना रूग्णांची संख्या किती होईल हे पाहणे गरजेचे आहे. जर ही संख्या जास्त प्रमाणात वाढली नाही तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रेल्वे सेवा पूर्ववत करण्याबाबत विचार करतील. ते सकारात्मकच राहतील. रेल्वे ही मुंबईची लाईफलाईन आहे. ती बंद असल्याने सामान्य जनतेला अनेक समस्यांना जावे लागत आहे, त्याची कल्पना आहे,” असे राजेश टोपे म्हणाले.

राज्यात नव्या स्ट्रेनचा रूग्ण अद्याप नाही

महाराष्ट्रात कुठेही नवा करोनाचा अवतार आढळला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. पण तरीही आवश्‍यक ती काळजी घेणे महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.

नव्या करोनाचा उद्रेक होत असल्याचे समोर येताच राज्यात येणाऱ्या आंतराष्ट्रीय फ्लाईट्‌स थांबवण्यात आल्या आहे. युकेमधील फ्लाईट थांबवणारे महाराष्ट्र हे पाहिले राज्य आहे.

इतकंच नाही तर सगळ्या प्रवाशांना इन्स्टिटयूशनल क्वारंटाईनही केले जात आहे. देश आणि राज्यात योग्य ती काळजी घेतली जात आहे, असेही त्यांनी सांगितले.

नव्या करोनाच्या संसर्गाचा वेग 70 % जास्त आहे. त्यामुळे संसर्ग अधिक गतीने होऊ शकतो. यामुळे अमेरिका आणि युरोप खंडातील लोक कठोर लॉकडाऊन करत आहेत. या पार्श्‍वभूमीवर राज्यात असे घडू नये यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी, असे टोपे यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.