सांस्कृतिक क्षेत्रातील गरजूंना मदत करणाऱ्यांचा सन्मान
पुणे – कलावंतांची सूची शासनाकडे नसल्याने मानधन देताना त्यांची शोधाशोध सुरू होते. याच पार्श्वभूमीवर सर्व लोककलावंतांच्या माहितीची सूची सांस्कृतिक विभागाकडून लवकरात लवकर तयार करण्यात येणार असून, सर्वांना ठरलेल्या दिवशीच मानधन मिळणार असल्याचे राज्याचे सांस्कृतिक खात्याचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितले. राज्यातील ज्येष्ठ कलावंतांना करोनामुळे मानधन देण्यास विलंब झाल्याबाबत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.
राज्य शासनाचा विठाबाई नारायणगावकर लोककला जीवनगौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ लावणी कलावंत गुलाबबाई संगमनेरकर आणि आण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ नाट्यकलावंत मधुवंती दांडेकर यांना जाहीर झाला.
रंगभूमी दिनाचे औचित्य साधून दोन्ही पुरस्कार्थींचा संवादच्या वतीने सत्कार झाला. यावेळी ज्येष्ठ नेते उल्हास पवार, अभिनेते प्रशांत दामले, प्रवीण तरडे, डॉ. दशरथ काळे, संवादचे सुनील महाजन आदी उपस्थित होते.
लॉकडाऊन काळात पडद्यामागील कलावंतांना आणि सांस्कृतिक क्षेत्रातील गरजूंना मदत करणाऱ्यांचा यावेळी सन्मान झाला. ज्येष्ठ कलावंतांना मानधन वेळेवर मिळण्यासाठीही कायमस्वरुपी उपाययोजना करण्याचे प्रयत्न सुरू झाहे. त्यामुळे यापुढील काळात मानधन मिळण्यात विलंब होणार नाही, असे यड्रावकर यांनी नमूद केले आहे.
ग्रामीण भागांतील प्रयोगांचे सर्व श्रेय गुलाबबाई, मधुवंतीताई यासारख्या ज्येष्ठ कलावंतांना आहे. त्यांनी कधीही अडचणी न सांगता, बैलगाडीने प्रवास करून असेल त्या परिस्थितीत गावोगावी जाऊन प्रयोग केल्यामुळे तेथील रसिकवर्ग टिकला असल्याने आमच्या नाटक, तमाशाला किंवा कार्यक्रमाला येतो. या कलावंतांनी झालेले अपमान हे अपमान म्हणून न बघता ते आव्हान म्हणून स्वीकारले आणि त्यावर मात केली. हे तरूण कलाकारांनी शिकण्यासारखे असल्याचे दामले म्हणाले.