कर्ज आणखी स्वस्त होणार?

रेपो दर आणखी कमी होण्याची शक्‍यता

पुणे – रिझर्व्ह बॅंक या आठवड्यात आपल्या कर्जाचे व्याजदर आणखी कमी करण्याची शक्‍यता गृहीत धरण्यात येत आहे. त्यामुळे व्यावसायिक बॅंका आपल्या कर्जावरील व्याजदरात आणखी घट करण्याची शक्‍यता आहे.

रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीची बैठक चालू असून रेपो दरांमध्ये कपात होईल, असे बहुतांश विश्‍लेषकांनी सांगितले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या महिन्यात कंपनी कर जवळ जवळ 10 टक्‍क्‍यांनी कमी केल्यानंतर आता सरकारकडे बाजारपेठेला चालना देण्यासाठी फारसे उपाय उरलेले नाहीत असे स्वतः रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्‍तीकांत दास यांनी सांगितले आहे. त्यामुळे रिझर्व्ह बॅंक आपली जबाबदारी पार पाडून या आठवड्यात आणखी एकदा व्याजदर कपात करण्याची शक्‍यता आहे.

मंदी रेंगाळल्यामुळे या वर्षात रिझर्व्ह बॅंकेने आतापर्यंत चारवेळा रेपोदरात 1.10 टक्‍क्‍यांनी कपात केली आहे. ऑगस्टमधील पतधोरणात रिझर्व बॅंकेने 0.35 टक्‍क्‍यांची कपात केल्यामुळे रेपोदर आता 5.40 टक्‍क्‍यांवर आला आहे. डिसेंबरपर्यंत रिझर्व्ह बॅंक रेपोदरात दोन टप्प्यांत 0.40 टक्‍क्‍यांची कपात करेल, असे समजले जात आहे. तर काही विश्‍लेषकांना वाटते की, या आठवड्यातच रिझर्व्ह बॅंक थेट 0.40 टक्‍क्‍यांची व्याजदर कपात करून बाजाराला चालना देण्याची शक्‍यता आहे. या अगोदरच्या पतधोरणावेळीही बॅंकेने रेपोदरात 0.35 टक्‍क्‍यांची कपात केली होती.

महागाई 4 टक्‍क्‍यांच्या आत रोखण्याचे नियोजन
रिझर्व्ह बॅंकेने महागाई 4 टक्‍क्‍यांच्या आत रोखण्याचे ठरविले आहे. महागाईचा दर अजूनही चार टक्‍क्‍यांच्या आत आहे. त्यामुळे व्याजदर कपातीने महागाई वाढणार नाही याबाबत बहुतांश विश्‍लेषकांचे मतैक्‍य झालेले आहे. ऑगस्ट महिन्यातील किरकोळ महागाईचा दर केवळ 3.21 टक्‍के होता. तर वस्तू उत्पादन आणि सेवा क्षेत्राची उत्पादकता वाढलेली नाही. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेलाही उत्पादकता वाढविण्यासाठी भांडवल आणखी स्वस्त करणे क्रमप्राप्त असल्याचे समजले जात आहे. जर महागाई कमी राहिली तर रिझर्व्ह बॅंक पुढील वर्षातही व्याजदर कपात करण्याची शक्‍यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.