मनोज गायकवाड मुंढवा, दि. 2 (प्रतिनिधी) -केशवनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते मांजरी रस्त्यापर्यंत व डावीकडील रेणुकामाता मंदिरापर्यंतच्या हद्दीत अनेक ठिकाणी अनधिकृत फ्लेक्स उभारण्यात आले आहेत. यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने जेथे मोकळी जागा दिसेल तेथे फ्लेक्स उभारले जात आहेत. महापालिकेच्या आकाश चिन्ह विभागाकडून याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याने महापालिकेनेच आता केशवनगरचे नामांतर रितसर “फ्लेक्सनगर’, असे करावे अशी चर्चा नागरिकांमध्ये होऊ लागली आहे.
केशवनगर परिसरातचे फ्लेक्समुळे मोठ्या प्रमाणात विद्रुपीकरण झाले आहे. सार्वजनिक रस्त्यावर, नाक्यावर शुल्लक कारणांसाठी मोठमोठे फ्लेक्स उभारले जात आहेत. केशवनगर भागात “स्वयंभू’ पुढाऱ्यांची संख्या वाढली आहे. आमचे दादा, युवकांचे आशास्थान…, अशी अनेक विशेषणे लावून कोणाताही सण असो, हॉटेलचे उदघाटन, वाढदिवस, पक्षप्रवेश, निवड, शुभेच्छा यासाठी फ्लेक्स लावले जात आहेत. एकाने फ्लेक्स लावला की त्याच्यापेक्षा मोठा फ्लेक्स लावण्याची स्पर्धा या भागात सुरू आहे. यासाठी लाखो रुपये खर्च होत आहेत. विशेष म्हणजे 12 महिने केशवनगर हा भाग भरगच्च फ्लेक्सने भरलेला असतो. यातून मोठी आर्थिक उलाढाल होत असली तरी परिसर विद्रूप होत आहे. परंतु, याची जाणीव “स्वयंभू’ पुढाऱ्यांना नाही. केवळ मोठेपणाचा देखावा केला जात आहे.
त्यातच अशा फ्लेक्सवर महापालिकेकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने याचे प्रमाण वाढतच चालले आहे. कायदेशीरदृष्ट्या अशा अनधिकृत फ्लेक्सवर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे. विनापरवाना फ्लेक्सबाबत क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारीही कारवाई करू शकतात. परंतु, अशी कारवाई करण्याचे “धाडस’ अधिकारी दाखवत नाहीत. यामुळे केशवनगर परिसराचे विद्रुपीकरण झाले आहे. याबाबत क्षेत्रीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी नेहमीच प्रमाणे फोन घेणे टाळले.
आकाशचिन्ह विभागाचे दुर्लक्ष
केशवनगरमध्ये अनेक व्यावसायिकांनी बेकायदेशीर होर्डिंग लावले आहेत. साधारण पाच वर्षांपूर्वी केशवनगर गाव हे ग्रामपंचायतीत होते. त्या काळात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर होर्डिंग उभारून त्यातून पैसा कमविण्याचा अजब प्रकार सुरू झाला. अनेक होर्डिंग मालकांनी कोणतीही परवानगी न घेता त्याचा कोणताही कर न भरता जागा दिसेल तिथे होर्डिंग लावले व पैसे कमविणे सुरू केले. आता केशवनगर महानगरपालिकेत गेले आहे. पालिकेच्या आकाशचिन्ह विभागाने अशा बेकायदेशीर होर्डिंगवर कारवाई करणे गरजेचे आहे. काही होर्डिंग धोकादायक झाले आहेत, ते पडून अपघातही होऊ शकतो, याबाबत संबंधित विभागाने कारवाई करणे गरजेचे ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.