अधिकारी करणार पाहणी
पुणे – शासकीय धान्य गोदाम ते रामवाडी या सुधारित मेट्रो मार्गात कल्याणी नगरमधील गोल्ड ऍडलॅबच्या परिसरात महामेट्रोकडून प्रस्तावित स्थानकाची जागा बदलण्याची शक्यता आहे.
स्थानकास स्थानिकांनी विरोध केल्यानंतर वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे यांनी स्थानकाची जागा बदलण्याची मागणी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. त्यानंतर पवार यांनी स्थानकाच्या जागेबाबत पाहणी करण्याच्या सूचना महामेट्रो अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्याची दखल घेत येत्या सोमवारी पाहणी होणार आहे.
प्रस्तावित स्टेशनची जागा अपुरी आहे. तसेच, या भागात ज्या आयटी कंपन्या आहेत, त्यामधील कर्मचाऱ्यांना सोयीचे ठरणार नाही. त्यामुळे हे स्टेशन एचडीएफसी बॅकेजवळ स्थलांतरित केल्यास आयटी कामगारांसह महाराष्ट्र हौसिंग बोर्ड परिसरातील कर्मचाऱ्यांना या मेट्रोचा फायदा घेता येईल. त्यामुळे मेट्रोच्या स्टेशनची जागा बदलण्याची मागणी केली असल्याचे टिंगरे यांनी स्पष्ट केले.