पुणे जिल्हा | जुन्नर ठाकरे गटाला सुटणार का?

बेल्हे, (वार्ताहर) – विधानसभेच्या निवडणुका सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यभरात पक्ष बांधणी करिता आणि योग्य उमेदवारांची चाचपणी सर्व पक्षांकडून सुरू आहे.
शिवसेना ठाकरे गटाकडून जुन्नर मतदारसंघावर विलास वाव्हळ आळेकर (रा. आळे) यांनी दावा केला आहे. पक्ष फुटीनंतर विलास वाव्हळ पक्ष बांधणी करिता मेहनत घेतल्याची चर्चा आहे.
तसेच महाराष्ट्रातील तेली समाजाचा एक महत्त्वाचा चेहरा म्हणून वाव्हळ यांना पाहिले जाते. नुकतीच त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची भेट घेतली असली तरी महाविकास आघाडीत ही जागा ठाकरे गटाला सोडली जाईल की नाही, याबाबत उलट सुलट चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
विलास वाव्हळ हे संजय राऊत यांचे निकटवर्ती असून काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी तयारीला लागा असे सांगितले होते. तसेच जुन्नरकरांचा प्रश्न तडीस नेण्यास ते पाठपुरवा करतात.
विलास वाव्हळ आळेकर मागील 35 वर्षांपासून राज्याच्या राजकारणात सक्रिय असून त्यांनी आत्तापर्यंत अनेक महत्त्वाची पदाची जबाबदारी शिवसेना ठाकरे गटाकडून पार पाडली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष संघटक आणि पक्ष कार्यकारी सदस्य, बृहन महाराष्ट्र तेली समाज, संताजी तेली क्रांती मोर्चाचे संस्थापक अशा पदांवर ते गेल्या अनेक वर्षांपासून समाजकार्य करत आहे.
महाराष्ट्रातील तेली समाजाचा महत्त्वाचा चेहरा
शिरूर लोकसभा संपर्कप्रमुख, पुणे जिल्हा सहसंपर्कप्रमुख या पदावर असताना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी भरीव कामगिरी करत महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना निवडून निवडणुकीमध्ये प्रचंड मेहनत घेऊन विजय प्राप्त करून दिला आहे.
तसेच महाराष्ट्रसह गुजरात राज्यातही त्यांचे तेली समाजावर प्राबल्य मोठ्या प्रमाणावर आहे. विदर्भात 28 विधानसभा मतदारसंघ असून सर्व मतदारसंघांमध्ये तेली समाजाचे मोठे वर्चस्व असून जर का विलास वाव्हळ यांना उमेदवारी दिली तर निश्चितच जुन्नरसह विदर्भातही तेली समाजाकडून उद्धव ठाकरे यांना चांगला पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.





