नवी दिल्ली – एकीकडे कॉंग्रेस पक्षाचा नवा अध्यक्ष निवडीची प्रक्रिया जोरात सुरू असताना आता भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षांचीही मुदत येत्या जानेवारी महिन्यात संपत आहे. अमित शहा यांच्यानंतर अध्यक्षपदाची सूत्रे स्विकारणारे जगतप्रकाश नड्डा यांनाच आणखी एक टर्म अध्यक्षपदाची संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.
शहा देशाचे गृहमंत्री झाल्यानंतर जुलै 2019 मध्ये नड्डा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. भाजपच्या घटनेनुसार अध्यक्षपदासाठी संबंधित व्यक्तीची तीन तीन वर्षांसाठी सलग निवड केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे पक्षाच्या घटनेतील तरतुदीनुसार किमान 50 टक्के प्रदेश शाखांमधील संघटनात्मक निवडणुकांनंतरच राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सुरू केली जाउ शकते.
त्यानुसार ऑगस्ट महिन्यात प्रदेश शाखांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित होते. मात्र ती अद्याप सुरू झालेली नाही. यावर्षी गुजरात आणि हिमाचल प्रदेश तर पुढच्या वर्षी कर्नाटक, मेघालय, मिझाराम, त्रिपुरा, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ आणि तेलंगणा आदी राज्यांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. पक्षाचे नेते या निवडणुकांतच व्यस्त राहणार असल्यामुळे त्याचसोबत संघटनात्मक निवडणुका घेता येणे शक्य नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
माजी अध्यक्ष अमित शहा याच कारणामुळे 2019 मध्ये लोकसभा निवडणूक होईपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. भाजपमधील सूत्रांच्या म्हणण्यानुसार नड्डा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासातील आहेत. तसेच त्यांच्या कार्यकाळात पक्षाची कामगिरीही चांगली झाली आहे. तसेच जातीय समीकरणे मांडायची झाली तर त्यातही ते फीट बसतात. त्यामुळे त्यांनाच मुदतवाढ मिळण्याची शक्यता अधिक आहे.