दिल्ली वार्ता: युती सेनेच्या अटीवर होणार की…

वंदना बर्वे

भाजप आणि शिवसेनेतील जागा वाटपाचं घोंगडं अजूनही भिजत आहे. दोन्ही पक्षांनी समान जागा लढवाव्यात अशी सेनेची भूमिका आहे. भाजप मात्र, शंभरच्या वर जागा सोडायला तयार नाही.

निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली. दोन्ही राज्यांमध्ये 21 ऑक्‍टोबर रोजी मतदान आणि तीन दिवसांनंतर अर्थात 24 ऑक्‍टोबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनोहरलाल खट्टर यांच्या भविष्याचा फैसला. चेंडू आता मतदारांच्या कोर्टात गेला आहे. महाराष्ट्रात 288, हरियाणात 90 जागांसाठी तर देशभरातील 65 ठिकाणी पोटनिवडणूक होणे आहे.

महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्रीपदावरून खडाजंगी होण्याची शक्‍यता आहे. ही समस्या हरियाणात नाही. येथे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर हेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आहेत. महाराष्ट्रात मात्र तसं नाही. विधानसभेची निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात लढविली जात असली तरी भाजपचे सरकार आल्यास ते पुन्हा मुख्यमंत्री होतीलच असे नाही. कारण, पक्ष देईल ती जबाबदारी आपण स्वीकारायला तयार आहोत, असे विधान फडणवीस यांनी स्वतः केलं होतं. त्यामुळे भाजपचे सरकार आले तर पुढचा मुख्यमंत्री कोण? हा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

शिवसेनेने पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून पुढे केले आहे. यामुळे देवेंद्र फडणवीस यांची लढाई फक्‍त कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत आहे असे नव्हे तर, शिवसेनेचाही सामना तेवढ्यात ताकदीने करावा लागणार आहे. भारतीय जनता पक्षाने लोकसभेच्या निवडणुकीत रालोआची आघाडी व्हावी म्हणून हातच्या जागा मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जेडीयूसाठी सोडल्या होत्या. हाच फार्म्युला महाराष्ट्रात अंमलात आणला जावा, असा सेनेचा हट्ट आहे. भाजप यासाठी तयार होईल असे अजिबात वाटत नाही. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, भाजपने सोडलेल्या कमी जागांचा प्रस्ताव सेनेकडून एकदा मान्य केला जाईल. परंतु, मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून सेना कोणताही समझोता करायला तयार नाही. विधानसभेच्या निवडणुकीत भाजप-सेनेची युती नक्‍की होणार असा दावा दोन्ही पक्षांकडून केला जात आहे. परंतु, दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून वाद निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

या निवडणुकीत मुख्य सामना रंगणार आहे तो, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी विरुद्ध भाजप-शिवसेना युती यांच्यात. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे समान जागावाटपावर एकमत झाले आहे. भाजपविरुद्ध प्रचार करणारे राज ठाकरे विधानसभेसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीसोबत जाणार का, हा प्रश्‍नही उपस्थित होत आहे. याबद्दल राज ठाकरे किंवा कॉंग्रेस-राष्ट्रवादीने उघडपणे कोणतेही भाष्य केले नसले, तरी या राजकीय समीकरणाकडे विधानसभेच्या वेळेस सर्वांचच लक्ष असेल. या पक्षांव्यतिरिक्‍त वंचित बहुजन आघाडी, शेतकरी कामगार पक्ष यांचीही भूमिका महत्त्वाची राहील.

सध्या, भाजपचे पारडं जड दिसत असले तरी सेनेने आपली आक्रमक भूमिका अद्याप सोडलेली नाही. किंबहुना, निवडणुकीच्या तोंडावर सेनेच्या अंगात बारा हत्तीचे बळ संचारतं असा अनुभव आहे. सरकारने कलम 370 प्रमाणेच राम मंदिरासाठी धाडसी पाऊल उचलावे, असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले होते. मात्र, लगेच त्यांनी मवाळ भूमिका घेतली. राम मंदिराचा निकाल लवकरात लवकर लागेल, असा पंतप्रधानांना विश्‍वास असेल, तर त्यासाठी वाट पाहणे रास्त आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

भाजप-सेनेचे नेते वाटाघाटीसाठी जेव्हा एकत्र बसतील तेव्हा सगळं बरोबर होईल असं फडणवीस यांनी अनेकदा बोलून दाखविले आहे. अर्थात, सेना कुणालाही घाबरत नाही अशी प्रतिमा लोकांसमोर कायम ठेवण्यासाठी आक्रमक भाषेचा वापर करायचा आणि वाटाघाटीसाठी बसताना मवाळ भूमिका घ्यायची, हा सेनेचा स्वभाव आता लक्षात आला आहे. यामुळे नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचा सेनेने कितीही समाचार घेतला तरी उद्धव ठाकरे शेवटी भाजपशी युती करतील यात तीळमात्र शंका नाही. केंद्र आणि राज्यात सरकार स्थापन झाल्याच्या पहिल्या दिवसापासून सेनेची आगपाखड सुरू होती. तरीसुद्धा, युती होणार हे सगळ्यांनाच माहीत होतं. याबाबत कुणाच्याही मनात कधीच शंका नव्हती. प्रश्‍न फक्‍त एवढाच होता की, कोणत्या अटीवर युती होणार?

केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या हातून वारंवार अपमानित होऊनही सेना सत्तेतून बाहेर का पडली नाही? असा प्रश्‍न वारंवार विचारला गेला. ठाकरे यांनी हा प्रश्‍न मोठ्या शिताफिने हाताळला असं म्हणावं लागेल. केंद्राच्या सत्तेतून सेना बाहेर पडली असती तरी मोदी सरकारला काहीही फरक पडला नसता. राज्याच्या सत्तेतून सेना बाहेर पडली असती तर फडणवीस सरकारही काही कोसळणार नव्हतं. राष्ट्रवादी मंडळी मदतीला धावून आले असते. आणि सेनेच्या हातून तेलही गेले असते, तूपही गेले असते.

आता भूतकाळ पुन्हा समोर आला आहे. युती कोणत्या अटीवर होते आणि आदित्य ठाकरे यांचं भविष्य सावरण्यासाठी सेना काय करते? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.