काही वस्तू व सेवा महागण्याची शक्यता : जीएसटी अधिभार वाढवण्याचा विचार
पुणे – एप्रिल ते नोव्हेंबरपर्यंतचे जीएसटी संकलन समाधानकारक नाही. नुकसान भरपाईसाठी राज्यांना जी रक्कम देणे अपेक्षित असते, ती केंद्र सरकारने दोन महिन्यांपासून दिलेली नाही. त्यामुळे जीएसटी संकलन वाढवण्यासाठी पुढील पंधरवाड्यात दराची फेररचना आणि अधिभार वाढविण्याच्या शक्यतेवर विचार केला जाणार असल्याचे बोलले जाते.
जीएसटी प्रणाली सुरू करताना राज्यांच्या कर संकलनात जर तूट असेल, तर काही प्रमाणात नुकसान भरपाई देण्याचे केंद्र सरकारने सांगितले होते. मात्र, एकूणच विकास दर कमी असल्यामुळे उद्योग आणि सेवा क्षेत्रातून पुरेशा प्रमाणात जीएसटी संकलन झालेले नाही. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून केंद्र सरकारने राज्यांना नुकसान भरपाई दिलेली नाही. या राज्यांनी केंद्र सरकारकडे यासाठी आग्रह धरला आहे, याबद्दल अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी खंत व्यक्त केलेली आहे.
आता पुढील पंधरवड्यात होणाऱ्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत अधिभार वाढविण्याच्या शक्यतेवर विचार केला जाणार असल्याचे सांगितले जाते. जीएसटी परिषदेने विषय पत्रिकेबाबत राज्याकडे सूचना मागविल्या आहेत. राज्यांना जी नुकसानभरपाई देणे अपेक्षित आहे, ती सध्याच्या कर संकलनातून देणे शक्य नसल्यामुळे अधिभार वाढवण्याच्या शक्यतेवर विचार केला जात आहे. नुकसानभरपाई देण्यासाठी काय करावे लागेल, याबाबत राज्यांकडून सूचना मागविल्या आहेत.