इस्लामाबाद : पाकिस्तानातील राजकीय कोंडी संपवण्यासाठी लष्कराशी चर्चा करणार असल्याचे पाकिस्तानातील ज्येष्ठ राजकीय नेते मेहमूद खान अचकझाई यांनी म्हटले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांच्या पक्षातील नेत्यांसह इतर पक्षातील नेत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. अचकझाई हे पख्तुनख्वा मिल्ली आवामी पार्टीचे अध्यक्ष आहेत. संसदेत बोलताना त्यांनी ही घोषणा केली.
राजकीय कोंडी संपवण्यासाठी सर्व संबंधितांशी आपण चर्चा करणार आहोत. व्यक्ती आणि प्रस्थापितांशीही आपण चर्चा करणार आहोत. मात्र त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी नव्हे तर सन्मानाने माघार घेऊन कोंडी सोडवण्यासाठी मार्ग निर्माण करता यावा यासाठी आपण ही चर्चा करणार आहोत, असे अचकझाई म्हणाले. पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्ष सरकारशी चर्चा करायला तयार असल्याच्या मुद्यावर संसदेत चर्चा झाली. त्यावेळी ही चर्चा करण्यासाठी अचकझाई तयार आहे का, असा प्रश्न संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी विचारला.
अचकझाई यांनी आयुष्यभर राजकारणातील लष्कराच्या हस्तक्षेपाला विरोध केला आहे. त्यामुळे या चर्चेतून ते नकारात्मक प्रतिसादच देतील, अशी शक्यताही आसिफ यांनी व्यक्त केली. पाकिस्तानत नव्याने अस्तित्वात आलेल्या तेहरिक तहाफूज आयीन-पाकिस्तान या विरोधकांच्या आघाडीचे नेते म्हणून अचकझाई यांना नियुक्त करण्यात आले आहे. पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्षाने अचकझाई यांना लष्कराशी चर्चा करण्यासाठी मान्यता दिली आहे. पाकिस्तानच्या राज्यघटनेचे रक्षण करण्याच्या हेतूने स्थापन करण्यात आलेल्या तेहरिक तहाफूज आयीन-े-पाकिस्तान या विरोधकांच्या आघाडीवर इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाचेच वर्चस्व आहे.