बंगलुरू – कर्नाटकात आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याचे संकेत आज खुद्द मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनीच दिले आहेत. त्यांनी म्हटले आहे की भाजपचे प्रभारी व पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरूण सिंह हे बंगळुरू मध्ये दाखल झाले असून मी या संबंधात त्यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यानुसार त्यांनी अरूण सिंह यांच्याशी ते शिमोगाला रवाना होण्यापुर्वी चर्चा केली.
मंत्रिमंडळ विस्ताराच्या संबंधातील महत्वाच्या बैठका आज आणि उद्या शिमोगा येथेच होणार आहे. याच महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार असल्याचे संकेत आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराला अनुमती मिळावी यासाठी येडियुरप्पा यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे अनेक वेळा अनुमती मागितली होती.
पण अखेर विलंबानंतर त्यांना अशी अनुमती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कॉंग्रेस- जेडीएस पक्षातील अनेक जण भाजप मध्ये नव्याने दाखल झाले असून त्या सर्वांनाच मंत्रिपदाची आशा आहे. अनेक जण मंत्रिपदासाठी उत्त्सुक असल्याने हे विस्ताराचे काम जिकीरीचे बनले आहे.