पुणे – शहरातील नद्या आणि नाले दूषित व रसायनयुक्त पाणी मिसळल्याने अस्वच्छ आणि प्रदूषित झाल्या आहेत. अतिक्रमणे आणि राडारोडा टाकल्याने नदीपात्र अरुंद झाले आहे. नदी शुद्धीकरण आणि सुंदर करण्यासाठी मुळा-मुठा शुद्धिकरण योजनेसाठी केंद्र शासनाचे 990 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. या योजनेचे काम सुरू झाले आहे. पुढील पाच वर्षांत हा महत्त्वकांक्षी प्रकल्प पूर्ण करून पुण्यातील नद्या सुंदर व शुद्ध करण्यास प्राधान्य देणार असल्याची माहिती पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आणि महायुतीच्या उमेदवार माधुरी मिसाळ यांनी दिली.
प्रचारार्थ आयोजित कोपरा सभेत त्या बोलत होत्या. शहर भाजपचे सरचिटणीस दीपक मिसाळ, नगरसेविका मानसी देशपांडे, अनुसूचा चव्हाण, राजश्री शिळीमकर, कविता वैरागे, बाळासाहेब ओसवाल, विशाल पवार, प्रवीण दिवेकर, नितीन बेलदरे, प्रीतम नागपुरे, निलेश हादगे, नितीन पोटे, संजय पोटे, आदित्य जागडे, कालिदास जागडे, अजय भोकरे, मनोज देशपांडे, प्रशांत दिवेकर, प्रशांत दिवेकर, प्रभाताई मटाले, सचिन वांगणे, शेखर वाघ, संजय गावडे, अमर हिंगमीरे, अमोल रासकर यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
मिसाळ म्हणाल्या, नदीसुधार योजनेअंतर्गत 11 मैलापाणी शुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार आहेत. 113.60 किलोमीटरच्या मलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. मध्यवर्ती भागातून वाहणारे आंबिल ओढ्यासारख्या नाल्यांच्या विकासावर भर देणार आहे. सध्याच्या मैलापाणी प्रकिया केंद्रांचे नूतनीकरण आणि नदीकाठ सुशोभिकरण विकास प्रकल्पाला गती देणार आहे. या प्रकल्पांमुळे शेतीसाठी दररोज 512 दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. मुळा-मुठा नदीचे प्रदूषण कमी होऊन जलपरिसंस्थेच्या संवर्धनासाठी लाभ होणार आहे.
यानंतर मिसाळ यांच्या प्राचारार्थ प्रचारफेरीही काढण्यात आली. त्यास मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळीही मिसाळ यांनी मतदारांशी संवाद साधून पुन्हा संधी देण्याचे आवाहन केले.