भोर : भोर उपजिल्हा रुग्णालय भोर येथे रोटरी क्लब लक्ष्मी रोड पुणे यांनी उभारलेल्या सौरऊर्जा प्रकल्प व रोटरी कम्युनिटी हॉलचे लोकार्पण सुभाष केमिकल इंडस्ट्रीयलचे भरत जामवाल यांचे हस्ते करण्यात आले.भोर उपजिल्हा रुग्णालयाला महिन्याला येणारे वीजबिल, त्यातूनच मागील काळातील थकलेले आठ महिन्यांचे वीजबिल, विजेअभावी आरोग्यसेवेत येणारा व्यत्यय यांमुळे सतत आरोग्य विभाग व रुग्णांची गैरसोय होत होती.
यामुळे रोटरी क्लब पुणे लक्ष्मी रोड यांच्या माध्यमातून वीजबिल कमी व्हावे, यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला. तसेच नेत्रतपासणी, अस्थिव्यंग शिबिर, दिव्यांग शिबिर, आरोग्यविषयक कार्यक्रम घेण्यासाठी सुसज्ज असा कम्युनिटी हॉल बांधण्यात आला आहे. रोटरी इंटरनॅशनल ग्लोबल ग्रॅन्ड माध्यमातून हा फंड उपलब्ध करण्यात आला आहे. तर रोटरी क्लब भोर राजगड यांचे सहकार्य लाभले आहे.
सौरऊर्जा प्रकल्पात शंभर लोकांच्या गरम पाण्याची व्यवस्था, शस्त्रक्रिया कक्षात वेगळी व्यवस्था व रुग्णालयासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. रोटरीकडून जवळपास दोन कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या लोकार्पण सोहळ्यासाठी रोटरी क्लब पुणे लक्ष्मी रोडचे अध्यक्ष रोटे, तुषार गोरे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आनंद साबणे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. जयदीपकुमार कापसीकर, भोर राजगड रोटरीच्या अध्यक्षा डॉ. रुपाली म्हेत्रे, रोटरी क्लब पुणे लक्ष्मी रोडचे माजी अध्यक्ष सदानंद भागवत, दीपा भागवत, प्रा. विनय कुलकर्णी, डॉ. प्रियंका राऊत, रुग्ण कल्याण समिती सदस्य विलास मादगुडे उपस्थित होते.
भोर तालुक्यातील आरोग्य केंद्रांना रोटरीच्या माध्यमातून विविध साधने उपलब्ध झाल्याने रुग्णसेवेत मदत मिळाली असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. जयदीपकुमार कापसीकर यांनी सांगितले. भोर राजगड रोटरीच्या अध्यक्षा डॉ. रुपाली म्हेत्रे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. विनय कुलकर्णी यांनी आभार मानले.