शिरूर- हवेलीतील समर्थकांचा दावा
शिरूर – शिरुर- हवेली विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून माजी आमदार अशोक पवार रिंगणामध्ये उतरले आहेत. मतदारसंघातील दिग्गजांनी शेवटच्या क्षणी माघार घेतली असली तरी अशोक पवारांविरोधात सर्व विरोधक एकवटले असल्यामुळे त्यांना सहानुभूतीचा लाभ होईल, असे समर्थकांना वाटते आहे.
शिरूर- हवेलीच्या आखाड्यात एकूण दहा उमेदवार उभे आहेत. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अशोक पवार व भाजपाचे बाबूराव पाचर्णे यांच्यात सरळ लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. एकीकडे अशोक पवार यांच्याविरोधात सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते एकत्र आले आहेत.
हे सर्व शिरूर-हवेलीतील नागरिकांना माहिती असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार माजी आमदार पवार यांच्याविरोधात सर्व नेते गेल्याने मतदारांमध्ये पवार यांच्याविषयी सहानुभूतीची लाट निर्माण होत आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. 2009 ते 2014 या कालावधीत तत्कालीन आमदार पवार यांच्या आमदारकीच्या काळामध्ये त्यांनी शिरूर-हवेली तालुक्यात विकासकामे केली आहेत.
या विकासकामांची चर्चा 2019 पर्यंत नागरिकांमध्ये आहे. त्यांनी शिरूर-हवेलीमध्ये संपूर्ण राज्याने दखल घ्यावी अशा अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजना देशात राज्यात लागू झालेले आहेत. त्यांनी शिरूर- हवेली तालुक्यात केलेली विकासकामे नागरिकांना दिसत आहे. त्यांच्या विकासकामांची चर्चा अशोक पवार यांचा पराभव झाल्यानंतरही पाच वर्ष शिरूर हवेली तालुक्यात सुरू होती. या विकासकामांच्या जोरावर पवार पुन्हा आमदार होतील, याची विरोधकांना भीती आहे. ते पुन्हा आमदार होऊ नयेत म्हणून शिरूर- हवेलीतील सर्व राजकीय मंडळी एका व्यासपीठावर आली आहेत.
शिरूर- हवेली तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते सोडून गेल्याने अशोक पवार यांच्याविषयी सहानुभूतीची असल्याची भावना त्यामुळे व्यक्त केली जात आहे.