ग्रामपंचायतींना विशेष अनुदानासाठी पाठपुरावा करणार- धैर्यशील माने

विनोद मोहिते (प्रतिनिधी) –

इस्लामपूर: वाळवा तालुक्यात महापुराच्या संकटानंतर कोरोनामुळे ग्रामपंचायतींच्या महसुलात प्रचंड घट झाली आहे. घरपट्टी,पाणीपट्टीसह इतर वसुली पूर्णतः ठप्प आहे. ग्रामपंचायतींना विशेष अनुदान मिळवण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली.

ते म्हणाले, वाळवा तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींना कोरोना सारख्या आपत्तीच्या काळात गावातील स्वच्छता करणे, औषध फवारणी करणे, कर्मचाऱ्यांचे पगार देणे यासाठी निधीची कमतरता असल्याच्या प्रश्नावर खा. माने यांचे तालुक्यातील अनेक सरपंचांनी लक्ष वेधले असता त्यांनी आश्वासन दिले.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर खा. माने यांनी वाळवा तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी,जिल्हा परिषद,पंचायत समिती सदस्य, सभापती, उपसभापती, तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच यांचेशी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत आढावा घेतला.

सांगली-कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवरील शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत दखल घेतली जाईल. काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनी कोल्हापूर जिल्ह्यातील लगतच्या गावात आहेत. अशा शेतकऱ्यांना पासेस उपलब्ध करून द्या अशी मागणी पंचायत समितीचे विरोधीपक्षनेते राहुल महाडिक यांनी व ऐतवडे खुर्द च्या सरपंच यांनी केली होती.

तालुक्यात स्थलांतरित झालेल्या नागरिकांची रेशन कार्ड कोठेही असुदेत त्यांना धान्य पुरवठा करण्यासाठी रेशन कार्ड पोर्टेबिलिटीचा फायदा द्या.तातडीने धान्य उपलब्ध करून द्या अशा सूचना खासदार धैर्यशील माने यांनी प्रशासनाला केल्या. यावर तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी बाहेरून आलेल्या नागरिकांची संख्या लक्षात घेऊन धान्यांची आगाऊ नोंदणी करावी असे आवाहन सरपंचाना केले. अ आणि ब वर्ग रेशनकार्ड धारकांना सरसकट मोफत धान्य पुरवठा केला जावा अशी अपेक्षा व्यक्त केली गेली. याबाबत शासन स्तरावर निर्णय होईल असे खा. माने यांनी सूचित केले.

पर जिल्ह्यातून वाळवा तालुक्यात येणाऱ्या लोकांची यादी मिळावी अशी मागणी वाळव्याच्या सरपंच सौ माळी यांनी केली.. याबाबत उत्तर देताना आरोग्य अधिकारी डॉ. साकेत पाटील म्हणाले,” पर जिल्ह्यातून येणाऱ्या सर्व नागरिकांची यादी दररोज प्रशासनाच्यावतीने ग्रामपंचायतीला सायंकाळी साडेचारच्या दरम्यान ई-मेल द्वारे कळवली जाईल.जिल्ह्यात प्रवेश करताना प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी केली जाईल. सध्या तालुक्यातील २० हजार जेष्ठ नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली आहे.”

परवानगी घेऊन येणाऱ्या नागरिकांना होम की इन्स्टिट्यूट कोरंटाईन करायचे याबाबत नेमक्या सूचना द्या अशी मागणी पंचायत समितीचे सदस्य देवराज पाटील यांनी केली. काही गावात
इन्स्टिट्यूट कोरंटाईन करण्यासाठी शाळांमध्ये वर्ग खोल्या कमी असल्याचे निदर्शनास आणून दिले गेले.

वाळवा तालुक्यातील अंगणवाडी सेविका आशावर्कर यांना डिजिटल थर्मामीटर दोन दिवसात देणार असल्याचे गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे यांनी सांगितले. आपत्कालीन स्थितीत धोका पत्करून काम करणाऱ्यांना पीपीटी किट,थर्मल स्कॅनर व आवश्यक ती साधने तातडीने उपलब्ध करुन द्यावीत अशी मागणी जिल्हा परिषदेच्या सदस्या सुषमा नायकोडी यांनी केली. या संदर्भात जिल्हा नियोजन मंडळातून अतिरिक्त निधी देण्याबाबतच्या सूचना खा. माने यांनी प्रशासनाला दिल्या .

तालुक्यात मागील आठवड्यात वादळी वाऱ्याने वीज वितरण कंपनीच्या खांब पडणे ,तारा तुटणे, ट्रान्सफर जळणे,फ्युजा नसणे, खांब व तारा स्थलांतर करण्याबाबत अनेक सरपंचांनी तक्रारी केल्या. याला वीज वितरण कंपनीचे अधिकारी राजेंद्र सूर्यवंशी यांनी उत्तरे दिली. शेतीला दिवसा वीज पुरवठा व्हावा, ताकारी ते बोरगाव रस्ता खुदाई केली आहे ती तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी माजी जिल्हा परिषदेचे सदस्य जितेंद्र पाटील यांनी केली.

राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीवर असणाऱ्या चेक पोस्ट वाहनांच्या मोठ्या रांगा असतात. त्यातील चालक रस्त्यावर उतरून खाली येतात. यामुळे धोका निर्माण होत असल्याचे कणेगाव मालेवाडी,तांदूळवाडीच्या सरपंचांनी सांगितले. येथे कर्मचारी संख्या अपुरी आहे. ती वाढवण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना सूचना करू असे खा. माने यांनी सांगितले.
रात्री-अपरात्री ट्रकचालक गावात येतात याची माहिती प्रशासनाला कळत नाही. अशी तक्रार कापूसखेडच्या सरपंच मंदा धुमाळे यांनी मांडली. विनापरवाना गावामध्ये सोलापूर जिल्ह्यातील नागरिक आल्याचे कारंदवाडीच्या सरपंचांनी स्पष्ट केले. ही बाब गंभीर असल्याचे सांगत खा. माने यांनी प्रशासनाला सुनावले.

खा.माने म्हणाले,” शासनाने आखून दिलेल्या नियमांप्रमाणे रहा. बाहेर पडताना मास्कचा वापर करा. कायद्याने दिलेली वेळ उद्योग-व्यवसाय करताना पाळायला हवी. शासन आणि प्रशासन तुम्हाला मदत करत आहेच पण प्रत्येक नागरिकांनी स्वयंशिस्त बाळगला हवी.”

वाळवा तालुक्यात सुमारे अडीच हजार परप्रांतीयांनी आपापल्या भागात जाण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. देशातील विविध राज्यनिहाय परप्रांतीयांची संख्या उपलब्ध करून दिली तर रेल्वे प्रशासनाशी बोलून पश्चिम महाराष्ट्रातून स्पेशल ट्रेन ची व्यवस्था करता येईल का ? याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन खा. माने यांनी दिले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.