आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी 2 कोटी 73 लाखांचा कर जमा
पुणे – नवीन आर्थिक वर्षाची मिळकतकर बिले पालिकेने नागरिकांना ई-मेल तसेच मोबाइल वर मेसेजद्वारे लिंकने पाठविली आहे. त्यामुळे नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सुमारे 3 हजार 242 मिळकतकरधारकांनी सुमारे 2 कोटी 73 लाखांचा कर पालिकेच्या तिजोरीत जमा केला आहे. प्रत्येक वर्षी पहिल्या दिवशी सुमारे 12 ते 13 कोटी कर जमा होतो. मात्र, यंदा पहिल्यांदाच तो प्रत्येक वर्षाच्या तुलनेत केवळ 25 टक्के जमा झाला आहे.
महापालिकेकडून प्रत्येक वर्षी मार्चच्या शेवटच्या 10 दिवसांत बिलाची प्रिंट काढून ती पोस्टाच्या माध्यमातून नागरिकांना 1 एप्रिलला घरपोच दिली जातात. मात्र, यावर्षी 21 मार्चपासूनच करोनामुळे वेगवेगळे निर्बंध राज्यात लावले आहेत. त्यामुळे ही बिले नागरिकांपर्यंत गेलेली नाहीत. त्यामुळे पालिकेने यंदा नागरिकांना ऑनलाइन बिले पाठविली आहेत.
पालिकेकडून 2020-21 या वर्षासाठी 11 लाख 50 हजार मिळकतीची नोंदणी असून त्यातील साडेनऊ लाख मिळकतधारकांचे मोबाइल क्रमांक पालिकेकडे आहेत. तर साडेसात लाख जणांचे इ-मेल आहेत. या सर्वांना मेसेजद्वारे बिलाची लिंक आणि ऑनलाइन पैसे भरण्यासाठी सुविधा दिलेली लिंक पाठवली असल्याचे कर संकलन विभागाचे प्रमख उपायुक्त विलास कानडे यांनी सांगितले. तसेच ज्या नागरिकांना शक्य आहे त्यांनी कर भरून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
बिल ऑनलाइन अदा करू शकणार
महापालिकेने पाठवलेल्या एसएमएस आणि इ-मेलमध्ये नमूद लिंकवर क्लिक केल्यास मिळकतधारकांना 2020-21 चे मिळकतकराचे बिल पाहता येऊ शकते. त्यामुळे ते ऑनलाइन पद्धतीने अदा करू शकतात. लॉकडाऊनची अंमलबजावणी संपुष्टात आल्यानंतर तत्काळ 2020-21 ची मिळकतकराच्या बिलांची पावती छपाई करून पोस्टाने वितरित करण्यात येईल, असेही कर आकारणी-करसंकलन प्रमुख विलास कानडे यांनी कळवले आहे.