शिक्षकांच्या 10 हजार जागा भरणार : विनोद तावडेंची माहिती

– पवित्र वेब पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध

– 2 मार्च रोजी वर्तमानपत्रात जाहिरात देणार

मुंबई (प्रतिनिधी) – शिक्षक भरतीवरून सुरु असलेल्या संभ्रमाला आता पूर्णविराम मिळाला आहे. शालेय शिक्षण विभागातील बहुप्रतिक्षीत प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील 10,001 इतक्‍या शिक्षकांची भरती लवकरच केली जाणार आहे. परंतु, भरतीमधील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी पहिल्यांदाच पवित्र वेब पोर्टलवर जाहिरात प्रदर्शित करण्यात आली, असून येत्या 2 मार्च रोजी वर्तमानपत्रातून शिक्षक भरतीची जाहिरात देण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिक्षक भरतीची जाहिरात पवित्र वेब पोर्टलवर प्रदर्शित करण्यात आली. त्यावेळी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी या पोर्टलच्या माध्यमातून बहुप्रतिक्षीत प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांची भरती करणार असल्याचे सांगितले. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भ्रष्टाचार विरहीत ही पहिलीच शिक्षक भरती होणार आहे. विद्यार्थ्यांनी पवित्र पोर्टलमध्ये अर्ज करताना पोर्टलवरील माहिती शांतपणे वाचावी, कोणीही गोंधळून जाऊ नये, जेणेकरुन कमीत कमी त्रुटी राहती, असा सल्ला देतानाच अनेक वर्षांपासून रखडलेली शिक्षक भरती आता सुरु होत आहे. यासाठी शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, उपसचिव चारुशिला चौधरी यांच्या कार्यगटाने परीश्रम करुन काम पूर्ण केले, असे तावडे यांनी सांगितले.

शिक्षक भरतीची जाहिरात पवित्र पोर्टलवर संस्थाचालक आणि शिक्षणाधिकारी यांना उपलब्ध होईल. 2 मार्च 2019 रोजी शिक्षक भरतीची जाहिरात वृत्तपत्रात प्रसिध्द होणार आहे. त्याच वेळी पवित्र पोर्टलवर सदर जाहिरात उमेदवारांना पाहावयास मिळणार आहे, असेही तावडे म्हणाले. सुमारे 5000च्यावर शिक्षक अतिरिक्त झाल्यामुळे समायोजनात रिक्त जागा कमी झाल्या. 6 जिल्ह्यातील बिंदू नामावलीनंतर शून्य जागा खुल्या, एसईबीसी आणि ईबीसी वर्गासाठी दिसल्यामुळे त्या सहा जिल्ह्यांच्या बिंदूनामावलीची फेरतपासणी केल्यानंतर या जागा त्वरीत भरल्या जातील. तोपर्यंत 50 टक्के तिथल्या जागा भरल्या जातील, असेही शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले.

अशा भरणार जागा…
अनुसूचित जाती- 1704, अनुसूचित जमाती- 2147, अनुसूचित जमाती (पेसा)- 525, व्हि.जे.ए.- 407, एन.टि.बी.- 240, एन.टी.सी- 240, एन.टी.डी.- 199, इमाव- 1712, इ.डब्ल्‌ूयू.एस- 540, एस.बी.सी.- 209, एस.ई.बी.सी.- 1154, सर्व साधारण- 924

Leave A Reply

Your email address will not be published.