सार्वजनिक बांधकाम खात्याविरोधात गुन्हे दाखल करणार

रमेश टाकळकर : महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघात

शिक्रापूर – पुणे-नगर महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. दर चार वर्षांनी रस्ता नुतनीकरण करण्याचा कायदा असूनही सार्वजनिक बांधकाम विभाग रस्ता दुरुस्त करत नाही. या खड्ड्यांमुळे अनेक दुचाकीस्वारांच्या अपघातात वाढ झाली असल्याने या रस्त्यावर गत वर्षात झालेल्या प्राणांतीक अपघाताची माहिती घेऊन सार्वजनिक बांधकाम खात्याविरोधात गुन्हे नोंदविणार असल्याचे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पुणे जिल्हाध्यक्ष रमेश टाकळकर यांनी सांगितले.

पुणे-शिरुर रस्त्याचे 2005 साली बीओटी तत्त्वावर चौपदरीकरण करण्यात आले. क्रांतीवीर प्रतिष्ठान, अखिल भारतीय ग्राहक पंचायत व इतर सामाजिक संघटनांनी टोलविरोधी आंदोलन केल्यानंतर शासनाने पुणे-शिरुर रस्ता टोल उद्योजकाकडुन हस्तांतरित केला. दरम्यान हस्तांतरित करताना या रस्त्याचे नुतनीकरण करणे गरजेचे असूनही करण्यात आले नाही. दरम्यान 1 ऑक्‍टोंबर 2018 रोजी क्रांतीवीर प्रतिष्ठानने या रस्त्याच्या कामांसंदर्भात आंदोलन केले होते. यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्त्यावर तात्पुरती मलमपट्टी म्हणून प्रत्येक गावात चौक सुधारणा केली; मात्र या सुधाणनेनंतर काही दिवसांतच मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले. या रस्त्याची खरंच चौकसुधारणा गुणवत्तापूर्वक झाली आहे का? असा सवाल नागरिक करीत आहेत. या खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले असूनही सार्वजनिक बांधकाम खाते जाणीवपूर्वक दुर्लक्ष
करीत आहे.

नुकसान भरपाईचा दावा करणार- सरडे
कोरेगाव भीमा येथे खड्ड्यामध्ये पडून आज झालेल्या अपघातामध्ये खिल भारतीय ग्राहक पंचायत पुणे जिल्हा कोषाध्यक्ष भानुदास सरडे यांच्या मोटरसायकलचे नुकसान तर झालेच शिवाय त्यांना दुखापत झाली आहे. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मिलिंद बारभाई यांना दूरध्वनी करून खड्ड्यांबाबत तक्रार केल्यानंतर त्यांनी अर्ध्या तासात खड्डे बुजवून घेतो असे त्यांनी आश्‍वासन दिले. अद्यापपर्यंत खड्डे बुजवले गेले नाहीत. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याविरोधात वैद्यकीय एमएलसी रिपोर्ट घेऊन एफआयआर दाखल करणार असल्याचे व नुकसान भरपाई मिळण्यासाठी दावा दाखल करणार आहे.

रस्ता खराब, साइडपट्ट्याही उद्‌ध्वस्त
पुणे-नगर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असतानाच सार्वजनिक बांधकाम खात्याने शिक्रापूर ते रांजणगाव दरम्यान गॅस वाहिनीस दिलेल्या परवानगीमुळे साइडपट्ट्या उकरण्यात आल्यात. पावसामुळे रस्त्याबरोबरच साइडपट्ट्याही उद्‌ध्वस्त झाल्या आहेत.

पुणे-नगर महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागत असूनही सार्वजनिक बांधकाम विभागास रस्ते दुरुस्तीचा मुहूर्त मिळत नाही. अशा खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम खात्याविरोधात गुन्हा नोंदविण्याची आवश्‍यकता आहे.
-संजय पाचंगे, अध्यक्ष क्रांतीवीर प्रतिष्ठान

Leave A Reply

Your email address will not be published.